गुहागर – गुहागर तालुक्यात होणाऱ्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.तालुक्यात काही ठिकाणी चुरशीच्या लढती होणार हे लक्षात घेऊन हा बंदोबस्त करण्यात आला असून यासाठी ४ अधिकारी, ९ होमगार्ड, ३८ पोलीस कर्मचारी व अंमलदार तसेच २० एस.आर.पी. जवानांची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.
गुहागर तालुक्यात एकूण १४ ग्रामपंचायतसाठी रविवारी १८ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. हे मतदान शांततेत व्हावे यासाठी हा चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. डीवायएसपी सचिन बारी तसेच गुहागर पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंदोबस्त करण्यात आला असून मतदान होणाऱ्या प्रत्येक केंद्रावर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी शृंगारतळी येथे पोलिसांची अतिरिक्त तुकडी ठेवण्यात येणार असून गरज पडल्यास तेथून आवश्यक असलेल्या मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त वाढवला जाणार आहे.याच पार्श्वभूमीवर झोंबडी येथे पोलिसांचे संचलन देखील झाले. तालुक्यात सद्यस्थितीत कोणतेही मतदान केंद्र अथवा ग्रामपंचायत अतिसंवेदनशील व संवेदनशील नसल्याची माहिती गुहागर पोलीस ठाण्यातून प्राप्त झाली आहे मात्र काही ठिकाणी चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे यामध्ये पाटपन्हाळे, झोंबडी, पांगरीतर्फे हवेली आदी ग्रामपंचायतींचा यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केला जात आहे. एकूणच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुहागर पोलीस स्थानकातून चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून शांततेत मतदान करण्याचे तसेच पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन गुहागर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते यांनी केले आहे.
–गुहागर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी रविवारी प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे.या १४ ग्रामपंचायतमधून सरपंचपदासाठी ३० मेदवार रिंगणात असून ११६ उमेदवार सदस्यपदासाठी आपले नशीब आजमावणार आहेत. गेले काही दिवस तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकांचे वारे जोरदार वाहू लागले होते. आज यासाठी पप्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या असून गुहागर तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर प्रशासन सज्ज झाले आहे.