चिपळूण – चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे शासकीय जागेत साकारत असलेल्या देवराई अंतर्गत बोटॅनिकल गार्डनचा पहिला टप्पा आकार घेऊ लागला आहे. या प्रकल्पात लागवड केलेली विविध प्रकारच्या झाडांना फुले बहरू लागली आहेत. विशेष म्हणजे या देवराईला शुक्रवारी रात्री भेट देत विभागीय आयुक्त विजयकुमार सूर्यवंशी व जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी वृक्षारोपण केले.
कोकणातील देवराईंचे कालानुरूप अस्तित्त्व कमी होत आहे. पर्यावरण रक्षणासाठी व दुर्मीळ होत चाललेली वृक्षसंपदा आणि देवरायांचे अस्तित्त्व पुन्हा निर्माण करण्याकरिता सर्व पर्यावरण व निसर्गप्रेमींनी एकत्र येऊन कळंबस्ते येथे साडेतीन एकर जागेत देवराईची संकल्पना हाती घेण्यात आली. या कामात प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी पुढाकार घेतल्यानंतर नाम फाऊंडेशन, वन विभाग, काही कंपन्यांच्या सीएसआर फंडातून देवराई उभी करण्यासाठी पुढे आल्या. त्यानंतर जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कळंबस्ते येथील पशुसंवर्धन विभागाच्या जागेत सामुहिक श्रमदानातून वृक्षारोपण करण्यात आले. येथे एकाच दिवशी १९ विविध प्रजातींची १ हजार २५२ झाडे लावण्यात आली. येथे लागवडीपूर्वी चर खोदून ठिबक सिंचनची व्यवस्था करण्यात आली आहे. झाडांना नियमित पाणी मिळण्यासाठी बोअरवेलची देखिल व्यवस्था केली आहे. त्यानुसार एका विभागात एकाच जातीच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात बोटॅनिकल गार्डन अर्थातच विविध प्रकारची फुलझाडे लागवड करण्यास सुरुवात केली. या गार्डनला बहर आला आहे. हे गार्डन येत्या तीन-चार महिन्यांतच नागरिकांसाठी खुले होणार आहे. ही हिरवीगार देवराई चिपळूण, परिसराच्या पर्यावरणीय आणि नैसर्गिक वैभवात भर टाकेल आणि भविष्यातही बहरत राहील, असा विश्वास या वेळी कास्टिंग डिरेक्टर निरंजन जावीर यांनी व्यक्त केला होता. तर शुक्रवारी रात्री विभागीय आयुक्त विजयकुमार सूर्यवंशी व रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनीही प्रत्यक्ष या देवराईत वृक्षारोपण करत आपलेही योगदान दिले.