गुहागर- रत्नागिरी जिल्ह्यात नामवंत विद्यालय ओळखले जाणारे गुहागर येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयावर अखेर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. बोगस प्रवेश आणि बोगस परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना पदवीच्या थेट तिसऱ्या वर्षास बसवून मुंबई विद्यापीठाच्या पदव्या मिळवून देण्याचा अजब प्रकार गेल्यावर्षी उघडकीस आल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे राज्यात उच्च तंत्रशिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
गुहागर येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील गैरप्रकारांना सहकार्य करण्यास नकार देणाऱ्या ४ प्राध्यापकांना गुहागर एजुकेशन सोसायटीच्या संचालक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी काहींना सोबत घेऊन जीवघेणी मारहाण केल्याचा प्रकार गेल्यावर्षी घडला होता. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये उमटले होते. गुहागरचे आ. भास्कर जाधव यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे ही घटना अधिवेशनामध्ये मांडली होती. सध्या सुरु असलेल्याअधिवेशनातही पुन्हा आ. जाधव यांनी प्राध्यापकांना मारहाण करणाऱ्या आणि कोकणातील शिक्षणात गैरप्रकार घडवून आणून शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या या घटनेतील जबाबदार महाविद्यालयावर काय कार्यवाही केली? असा जाब विचारला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी संबंधित महाविद्यालय दोषी आढळले असून महाविद्यालयावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली असल्याचे सांगितले.
अधिक माहितीनुसार, या महाविद्यालयावर मुंबई विद्यापीठाने सत्यशोधन समिती गठित केली होती. या समितीने ३ वेळा महाविद्यालयाला भेट देऊन संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून आपला अंतिम अहवाल विद्यापीठास दिला होता. या संदर्भाने मुंबई विद्यापीठाने या महाविद्यालयाला दोषी मानून रुपये १० लाख एवढा दंड लावलेला असून प्रशासक नेमण्याची शिफारस सरकारकडे केली होती. सबब महाराष्ट्र शासनाने संबंधित महाविद्यालयावर प्रशासकाची नियुक्ती केली. प्रशासक म्हणून डॉ. किरणकुमार बोंदर, सह-संचालक, उच्च शिक्षण विभाग, पनवेल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
महाविद्यालयाच्या संचालक मंडळाच्या मनमानी कारभाराविरुद्ध आवाज उठवून हा लढा लढणाऱ्या ४ प्राध्यापकांवर १८ डिसेंबर २०२४ रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. यावेळी संबंधित प्राध्यापकांच्या पाठीमागे बॉम्बे यूनिवर्सिटी अँड कॉलेज टीचर्स यूनियन (बुक्टू) भक्कमपणे उभी राहिली. संघटनेने सर्व समविचारी शिक्षक संघटना (रत्नागिरी जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिति, कास्टट्राईब महासंघ, बहुजन विचार मंच, गुहागर तालुका माध्यमिक अध्यापक संघ), विद्यार्थी संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, सत्यम फाऊंडेशन, स्टुडेंट फेडरेशन ऑफ इंडिया तसेच समता सैनिक दल संघटनांना सोबत घेऊन २१ डिसेंबर २०२४ रोजी गुहागर येथे अभूतपूर्व असा विशाल मोर्चा आयोजित करून जनसामान्यातील उद्रेकाला वाट करून दिली होती. शिक्षण क्षेत्राला काळिमा फसणाऱ्या या घटणे विरुद्ध महाराष्ट्र राज्यातील आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी संघटना एकटवल्याचे आश्वासक चित्र तेव्हा दिसले होते. बुकटू संघटनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट मध्ये हा प्रश्न वारंवार लावून धरून विद्यापीठाला कठोर कारवाई करण्यास भाग पाडले.
बोगस पदवीधारकांवरील कारवाईकडे लक्ष
मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयावर प्रशासक नेमून केलेल्या दंडात्मक कारवाईमुळे समाजामध्ये योग्य संदेश गेला आहे. तरी या प्रकरणामध्ये परराज्यातील ज्या विद्यार्थ्यांनी अनैतिकपणे फक्त एका वर्षात मुंबई विद्यापीठाची पदवी मिळवली आहे. त्यांच्यावर विद्यापीठ काय कारवाही करेल? या विद्यार्थ्यांच्या पदव्या मुंबई विद्यापीठ रद्द करेल का? ही बघणे औसुक्याचे ठरणार आहे.















