मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा एकदा लुटमार, महिलेला चाकूचा धाक दाखवत अज्ञातांनी लुबाडले

0
1
बातम्या शेअर करा

संगमेश्वर- मुंबई-गोवा महामार्गावरील तळेकांटे येथे गुरूवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास खळबळजनक घटना घडली आहे. संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे गणपती मंदिराजवळ एका महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अज्ञात इसम आणि त्याच्या साथीदारांनी तब्बल एक लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिला श्रीमती भारती भार्गव कळंबटे (वय- ५८. रा. तळेकांटे) यांनी संगमेश्वर पोलीसात तक्रार दाखल केली आहे.

भारती भार्गव या तळेकांटे गणपती मंदिराजवळून चालत असताना अचानक मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून येणारे एक चारचाकी वाहन त्यांच्या जवळ थांबले. वाहनातून उतरलेला अनोळखी युवक आणि सोबतची महिला सुरुवातीला मार्ग विचारत सभ्यपणे बोलायला लागले. पण काही क्षणांतच दृश्य पलटले. युवकाने अचानक चाकू उगारत भार्गव यांना धमकावले आणि गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून दोघेही गाडीमध्ये बसत पळ काढला. सर्व काही काही सेकंदांत घडल्याने त्या क्षणात भयचकित झालेल्या भार्गव यांनी तत्काळ मदतीसाठी आरडाओरड केली, मात्र चोरी करणारे चोरट्यांप्रमाणे क्षणार्धात गायब झाले.

याबाबतची माहिती कळतच संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. तपास संगमेश्वर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर. एस. गावित यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला असून संशयितांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज, वाहनांचा तपशील आणि संभाव्य रुट्स तपासले जात आहेत. या थरारक घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here