गुहागर – गुहागर शहराला प्राप्त झालेल्या ब्लू फ्लॅग पायलट प्रकल्प मानांकनाच्या पार्श्वभूमीवर गुहागर समुद्रकिनारी नगरपंचायतीच्या वतीने आज वाळू शिल्प कलेचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. तालुक्यातीलच वाळू शिल्प कलाकारांनी समुद्रकिनारी विविध कलाकृती तयार करून वाळू शिल्पकलेची मंदीयाळी उभारली आहे.
गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या वाळू शिल्प कलेचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर ब्लू फ्लॅग प्रकल्प सहाय्यक दीपक विचारे यांच्या हस्ते फीत कापून या वाळू शिल्प प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी तहसीलदार परीक्षित पाटील, नरेश पेडणेकर, गटविकास अधिकारी शेखर भिलारे एडवोकेट संकेत साळवी पत्रकार सत्यवान घाडे आदी उपस्थित होते.

ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वाचे ठरले आहेत गुहागर शहरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी हजेरी लावली आहे. डिसेंबर महिन्यातील प्रत्येक विकेंड हाऊसफुल होत असतानाच समुद्रकिनारी राबवण्यात आलेल्या वाळू शिल्पकलेच्या प्रदर्शनाने या पर्यटनामध्ये आगळावेगळा कार्यक्रम ठरला आहे. असगोली येथील मूर्ती कलाकार संतोष घाणेकर यांनी गुहागर समुद्रकिनारी आपल्या कलेतून भगवान शंकराची वाळूमध्ये मूर्ती निर्माण केली आहे. त्याचबरोबर शहरातील नयनरम्य अशा अष्टवणे गणपती मंदिराची प्रतिकृती साकारली आहे तसेच गुहागर समुद्रामध्ये दिसणारे डॉल्फिन याचीही प्रतिकृती साकारली आहे. शहरातील जीवन शिक्षण शाळा नंबर एक चे कलाशिक्षक राजू सुर्वे व विद्यार्थी यांनी मिळून कोकण कल्चर ची कलाकृती साकारली आहे. रात्री उशिरापर्यंत वाळू शिल्प तयार करण्याचे काम कलाकार व गुहागर नगरपंचायतीचे कर्मचारी यांनी सहभाग घेतला आहे. आज रविवारी सकाळी श्री रामेश्वर चैतन्य भूमी येथे वृक्षारोपण तसेच समुद्रकिनाऱ्यावरील छोट्या व्यावसायिकांना डसवीणचे वितरण करण्यात आले. या वाळू शिल्प प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.















