चिपळूण – चिपळूण तालुक्यातील खंडपोली येथे आज सकाळी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. कपडे धुण्यासाठी गेलेल्या कुटुंबातील आठ वर्षांच्या मुलाचा पाय घसरून नदीच्या डोहात पडला. त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेणाऱ्या त्याच्या आई आणि आत्या यांचाही दुर्दैवाने मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आज सकाळी वाशिष्ठी नदीच्या डोहावर शिंदे व कदम कुटुंबीय कपडे धुण्यासाठी गेले होते. खेळता खेळता लक्ष्मणचा पाय नदीकाठच्या शेवाळावर घसरून तो पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याची आई लता कदम धावत पाण्यात गेली, पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ती स्वतःही बुडू लागली. हे पाहून रेणुका शिंदे यांनीदेखील त्यांना वाचवण्यासाठी उडी घेतली, पण दुर्दैवाने त्या तिघींचाही रेणुका धोंडीराम शिंदे , लता कदम आणि मुलगा लक्ष्मण शशिकांत कदम यांचा जीव गेला. काठावर बसलेल्या पूजाने आरडाओरड करत तातडीने आपल्या भावाला शुभम याला फोन करून घटनेची माहिती दिली. शुभम व त्याचा मावस भाऊ सचिन हे चिंचघरी येथून धावत घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तिन्ही जणांना बाहेर काढले. परंतु तोपर्यंत त्यांचा श्वास थांबला होता. या डोहाची खोली सुमारे १२ ते १४ फूट असून, पाण्याचा प्रवाहही जोरदार आहे. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने, तसेच आलोरे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भरत पाटील व अन्य पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही मृतदेहांची पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.