चिपळूण – चिपळूण तालुक्यातील खेर्डी औद्योगिक वसाहतीतील थ्री एम पेपर मिलमध्ये परप्रांतीय कामगारांवरून तापलेले वातावरण अखेर शांत झाले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यापुढे कामगार भरतीत स्थानिकांनाच प्राधान्य देण्याचे कंपनी व्यवस्थापनाने मान्य केले आहे. आणि स्थानिकांकडून 50 कामगारांची दिलेली यादी कंपनीने मान्य केली आहे.त्यामुळे या वादावर पडदा पडला असला तरी मात्र असे असले तरी यापुढे येथे असणार्या सर्वच कंपन्यांनी यापुढे स्थानिकांना प्राधान्य द्यावे अन्यथा गाठ आमच्याशी आहे असा इशारा युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते यांनी दिला आहे.
दोन आठवडय़ापूर्वी खेर्डीतील थ्री एम पेपर मिलमध्ये कोरोना लॉकडाऊनमध्ये उत्तरप्रदेशमधून आणलेल्या कामगारांवरून वातावरण तापले होते. त्याचवेळी रत्नागिरी जिल्हा दौऱयावर आलेल्या गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनीही या कामगारांना परत पाठवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱयांना केल्या होत्या. त्यानुसार शनिवारी सकाळी येथील पोलीस स्थानकात उपविभागीय पोलीस अधिकारी ढवळे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते यांच्यामध्ये बैठक झाली.
या बैठकीत कंपनीमध्ये उपलब्ध रोजगारामध्ये प्रथम स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे, अन्यथा स्थानिकांच्या रोजगारासाठी गुन्हे अंगावर घेण्यास तयार आहोत असे मत उपस्थितांनी मांडले. याबाबत अधिकाऱयांनी कंपनी व्यवस्थापनाशीही चर्चा करत त्यांची बाजू समजावून घेतली. व्यवस्थापनानेही स्थानिकांची मागणी मान्य केली. त्यानुसार खेर्डीतील 50 स्थानिकांची यादी कंपनीकडे देण्यात आली आहे. सदर यादीतील टप्प्या-टप्प्याने स्थानिकांना कंपनीत सामावून घेतले जाईल असे कंपनीकडून सांगण्यात आले.
![](https://pragatitimes.in/wp-content/uploads/2020/07/01911329297.jpg)