चिपळूण – चिपळूण नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार मिलींद कापडी यांनी अखेर माघार घेतली. मात्र राष्ट्रवादीने प्रभाग ९ आणि १० मधील २ जागांवरचा दावा कायम ठेवला आहे. यावर मित्रपक्ष भाजप व शिंदेसेना कोणती भूमिका घेते, त्यावर पुढील घडामोडी कोणत्या असतील हे ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
21 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असल्याने महाविकास आघाडीतही घडामोडी सुरू आहेत. महाविकास आघाडीतर्फे ३ उमेदवारांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरले आहेत. त्यापैकी ठाकरे शिवसेनेचे राजेश देवळेकर, काँग्रेसचे सुधीर शिंदे, लियाकत शहा यापैकी कोण माघार घेणार की आघाडीचे उमेदवार माजी आमदार रमेश कदम रिंगणात राहणार हे समोर येणार आहे.
महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने प्रभाग ९ आणि १० मधील दोन जागा मागितल्या होत्या. मात्र तेथे भाजपने उमेदवारी दाखल केली आहे. आता नगराध्यक्षपदासाठी मिलींद कापडी यांनी माघार घेत प्रभाग ९ व १० मधील जागांचा निर्णय राष्ट्रवादीने भाजप व शिंदे सेनेच्या कोर्टात टाकला आहे. या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीने तडजोड केलेली नाही. महायुतीमधील शिंदे शिवसेनेचे उमेश सकपाळ, तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून मिलींद कापडी यांचे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. पालकमंत्री उदय सामंत, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राष्ट्रवादीने महायुतीसाठी नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. तर प्रभाग ११ अ मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अमृता विलास कोंडविलकर यांनीही अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत ७ उमेदवार राहिले आहेत. उद्या दुपारी ३ पर्यत आणखी कोण माघारी घेणार याकडे चिपळूण शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
















