चिपळूण -चिपळूण शहरात १९ मार्चला लाॅकडाऊन जाहीर झाले. तेव्हापासून लाॅकडाऊन हे अंदाजे दीड महिना होते. नंतर थोड्याफार प्रमाणात व्यवसाय कसाबसा सुरु झाला. जिल्हाबंदी, एसटीची वाहतुक बंद, लोकांची आर्थिक तंगी यामुळे बाजारात व्यवसाय होत नव्हताच, त्यात परत १ जुलैला ८ दिवसासाठी रत्नागिरी जिल्हा लाॅकडाऊन झाला. हे आठ दिवस व्यापारी व नागरिकांनी अत्यंत काळजीपूर्वक नियमांचे पालन करुन कोरोनाची चेन तोडण्यासाठी शासनाला सहकार्य केले.
आता उद्यापासुन व्यवसाय सुरु होणार म्हणून व्यापारी यांनी माल मागवला होता. हाॅटेलवाल्यांनी तयारी केली होती. मिठाईवाल्यांनी वस्तू बनवण्यासाठी कच्चा माल तयार केला होता. याचा कोणताही विचार न करता माननीय जिल्हाधिकारी यांनी संध्याकाळी अचानक परत १५ जुलैपर्यंत लाॅकडाऊन जाहीर केला. व्यापारी आता मेटाकुटीला आलेला आहे. ना त्याला लाईटबील माफ झाले आहे, ना बॅंकेने हप्ता राहू दे, ना व्याज माफ केले आहे. व्यापारी स्वत:ची, कुंटुंबाची आणि ग्राहकाची सर्वतोपरी काळजी घेत आलेला आहे. आतापर्यंत व्यापारी याला अथवा त्याच्यामुळे ग्राहकाला (अपवाद सोडल्यास) कोरोना झाला आहे, असे कुठेही ऐकिवात नाही. जिभेचे चाचले पुरविणारे व्यवसाय सुरु ठेवायचे, कदाचीत श्रावण येतोय आणि त्यावेळी खाता येणार नाही, म्हणून आता खाता यावे, असं कुणाच्या डोक्यातून येऊन ते व्यवसाय सुरु ठेवायला परवानगी हा अजब फतवा आहे. एकीकडे माननीय मुख्यमंञी लाॅज, हाॅटेल महाराष्ट्रात सुरु करा सांगत आहेत. राज्याला अनलाॅककडे नेत आहेत. आदरणीय शरद पवारही तेच सांगत आहेत मोबाईलवरसुध्दा एखाद्याला रिंग केल्यावर देश अनलाॅक की तरह जा रहा है, अशी कॅसेट ऐकू येते आणि जिल्हाधिकारी माञ रत्नागिरी जिल्हा लाॅकडाऊन करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र हळुहळू अनलाॅककडे जात आहे माञ रत्नागिरी जिल्हा हा काही महाराष्ट्राच्या बाहेरचाच जिल्हा असल्यागत येथे निर्णय लादला जात आहे. दुधाच्या नावाखाली अनेक वस्तू विकल्या जात आहेत. जिथे गर्दी होते ते व्यवसाय सूरु ठेवले जात आहेत. कंटेनमेंटझोनमधील नागरिक बाजारात बिनदिक्कत फिरत आहेत, यावर कुठलेही प्रशासनाचे लक्ष नाही. तेव्हा आता माननीय मुख्यमंञी साहेबांनी या जिल्ह्याच्या बाबतीत लक्ष घालावे, अशी विनंती आहे. व्यापारी हा कुणीपण त्याला हाकावे अशा पध्दतीने त्पाला बघीतले जात आहे. आता संघटीत होऊन यावर आवाज उठविणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी याचा गांभीर्याने विचार केला पाहीजे. नाहीतर शासनाने आम्हाला आत्महत्या करण्याची सन्मानाने परवानगी द्यावी, कारण व्यापारी याला, रिक्षावाला, सलूनवाला छोटा रस्त्यावरचा व्यापारी याला कुठलेच पॅकेज दिलेले नाही, अथवा देणार ही नाही. लाॅकडाऊन का केलं गेलं, याचा सुध्दा खुलासा स्पष्ट कोणी करत नाही. तेव्हा माननीय मुख्यमंञ्यानीच आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती, चिपळूण नवयुग व्यापारी मंडळाचे अध्यक्ष शिरिष काटकर यांनी केली आहे.