चिपळूण – कोकणात सहकार वाढला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. त्यामुळे कोकणसाठी सहकार विभागीय कार्यालय चिपळुणात सुरू केले जाईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कोकणात तरुणांनी प्रकल्प सुरू करावेत, त्यासाठी पैसे मी देतो, असे आवाहन करतानाच अजित पवार यांनी वरीष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांशी केलेले वक्तत्व चुकीचेच असल्याचेही त्यांनी नमूद केले.चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यासाठी ते रविवारी येथे आले होते. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ढिगभर संस्था काढून काहीही फायदा नसून संस्था शेतकरी, तरुण व्यावसायिक, सर्वसामान्य नागरिक यांना किती मदत करते, हे महत्वाचे असते. काही संस्था फक्त आपल्या फायद्यासाठी स्थापन होतात. त्यामुळे अशा अनेक कारणांमुळे सध्या राज्यातील सहकार खाली जाताना दिसत आहे. अर्बन बँका बंद पडत असून पतसंस्थांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे सहकाराला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठीच आपण व्यस्त कामातूनही अध्यक्षपद घेतले आहे.
त्यामुळे मी खास करून कोकणातील तरुण, तरुणींना सांगेन की, तुम्ही चाकरमानी होण्यासाठी मुंबईत न येता येथील आंबा, काजू, दूध यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प साकारा, त्यासाठी लागणारा पैसा मी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून देईन. मात्र त्यासाठी तरुणांनी धाडस करायला शिकले पाहिजे. चिपळूण नागरी जास्तीत जास्त 2 कोटी रूपये कर्ज देते. त्यामुळे जर एखाद्या प्रकल्पाला 25 कोटी खर्च असेल तर उरलेले 23 कोटी मी देईन, असे आश्वासन देतानाच यासाठी पुढाकार घ्या, आगामी काळात किमान 5 मोठे प्रकल्प कोकणात उभे राहिले पाहिजेत, अशी साद दरेकर यांनी उद्योजक प्रशांत यादव यांना घातली.यावेळी उद्योजक प्रशांत यादव, स्वप्ना यादव, सतीश मोरे आदी उपस्थित होते.