मुंबई – मराठा आंदोलनाकांसाठी एक मोठी बातमी असून मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली आहे. ही परवानगी सध्या केवळ एका दिवसासाठी असून त्यामध्ये काही अटीशर्तीही घालण्यात आल्या आहेत. हे आंदोलन सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत परवानगी असेल असं मुंबई पोलिसांनी त्यांच्या आदेशात म्हटलं आहे.
मनोज जरांगे यांनी या आधी आझाद मैदानावरील आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना काही अटीशर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार मनोज जरांगे यांना फक्त एका दिवसासाठी आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासोबत फक्त पाच हजार आंदोलकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांच्या मुख्य अटी
आंदोलनाला एका वेळी फक्त एकाच दिवसाची परवानगी असेल. शनिवार, रविवार किंवा शासकीय सुट्टीच्या दिवशी परवानगी मिळणार नाही.
ठराविक वाहनांनाच परवानगी असेल. वाहनांची पार्किंग व्यवस्था पोलीसांच्या सल्ल्याने करावी लागेल.
आंदोलकांची वाहने ईस्टर्न फ्रीवेवरून वाडीबंदरपर्यंत येतील. त्यानंतर मुख्य नेत्यासोबत फक्त 5 गाड्यांना आझाद मैदानात प्रवेश मिळेल. बाकीच्या गाड्या पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणी पार्क कराव्या लागतील.आंदोलनात जास्तीत जास्त पाच हजार लोकच सहभागी होऊ शकतात.
आझाद मैदानासाठी सात हजार चौ. मीटर जागा राखीव असून ती इतक्या लोकांनाच सामावून घेऊ शकते. त्याच दिवशी इतर आंदोलकांनाही परवानगी दिली असल्याने त्यांचा हक्क अबाधित राहील.आंदोलनाच्या वेळी मोर्चा काढता येणार नाही.
परवानगीशिवाय माईक, स्पीकर किंवा गोंगाट करणारी साधने वापरता येणार नाहीत.आंदोलनाची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच मर्यादित आहे. त्यानंतर मैदानात थांबता येणार नाही.
आंदोलनाच्या जागेत स्वयंपाक करणे, कचरा टाकणे पूर्णपणे बंदी आहे.आंदोलनाच्या काळात गणेशोत्सव सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा, नागरिकांना त्रास किंवा धार्मिक भावना दुखावणारे वर्तन करता येणार नाही.
आंदोलनात लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि वृद्धांना सहभागी करू नये. गणेशोत्सवाच्या दरम्यान हे आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईतील रहदारीस कोणताही आंदोलनाच्या काळात गणेशोत्सव सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा, नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात यावी असं पोलिसांनी म्हटलं आहे.