वाई- ( प्रविण गाडे ) – सातारा जिल्ह्यातील वाई येथे डॉल्बीला (डीजे सिस्टिम) परवानगी नाकारली असुन
डॉल्बीबाबत प्रतिकूल जनमत, गावोगावी उत्स्फूर्त डॉल्बीबंदी, ऐनवेळी होणारा नियमभंग या सर्व बाबी विचारात घेता यंदा जागीच कडक कारवाई करण्याचे धोरण स्वीकारणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या आदेशाचे व पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या आसरे, ता. वाई, जि. सातारा येथे मर्यादेपेक्षा जास्त आवाजात लावलेल्या एका डॉल्बीवर वाई पोलिसांनी कारवाई केली आहे.
वाई तालुक्यात डॉल्बीच्या गोंगाटावर वाई पोलिसांनी ठाम आणि धडाडीची कारवाई करत दोघांविरुद्ध खटला दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी प्रसाद दुदुस्कर यांनी वाई पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, सचिन शिवाजी सावंत(वय ३३, रा. सुलतानपूर, ता. वाई) व अक्षय बाळू सणस(वय २७, रा. आसरे, ता. वाई) यांनी सार्वजनिक ठिकाणी डॉल्बीच्या माध्यमातून कर्कश गाणी वाजवत शांततेचा भंग केला. सदर आरोपींनी साउंड सिस्टीम/डॉल्बी रस्त्याच्या मधोमध उभा करून, नागरीकांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण करत गंभीर सार्वजनिक उपद्रव केला. ही घटना २ सप्टेंबर २०२५ रोजी आसरे ते वाई जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर नवलाई देवी मंदिरासमोर घडली. ही कारवाई वाईचे नवनिर्वाचित उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे तसेच पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वाई तालुक्यात गणेश उत्सव काळातील ही डॉल्बीविरोधात नोंदवलेली दुसरी कारवाई असल्याने ज्येष्ठ नागरिक, रुग्ण व नागरिकांतून पोलीस दलाच्या या कृतीचे स्वागत होत आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी ध्वनिवर्धक यंत्रणा वापरण्याविषयी नियम घालून दिले आहेत. त्यानुसार ध्वनिमर्यादा पाळावी लागते. मात्र त्याचवेळी खुद्द नागरिकांमधूनच डॉल्बीविरोधी सूर ऐकू आले. दबक्या आवाजात होणाऱ्या चर्चेला धार आली. काही गावांनी ग्रामसभा घेऊन डॉल्बी गावातून हद्दपार करण्याचा ठराव केला आणि यासंदर्भात जनमत काय आहे, याचे प्रतिबिंब माध्यमांमध्येही उमटले. दरम्यान, गेल्या वर्षी पोलिसांनी नोंदविलेल्या एका तक्रारीबाबत सातारा न्यायालयात निकाल होऊन संबंधित मंडळाला वीस हजारांचा दंडही झाला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी यंदा सर्वच नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची तयारी केली आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ध्वनिमर्यादा ओलांडणारी यंत्रणा जागीच बंद करण्याचे आणि ताब्यात घेण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. त्यामुळे सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर कायद्याचे कडक पालन करूनच अशा प्रकारांना आळा घालणार असल्याचे वाई पोलीस ठाण्याचे पो. नि. शहाणे यांनी सांगितले.