गुहागर – (रामदास धो. गमरे) संत गाडगेबाबा महाराज स्वच्छता अभियान हा देशातील एक महत्त्वाचा उपक्रम असून महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागात स्वच्छता आणि जनजागृती करणे व सामूहिक सहभागातून गावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी व स्वच्छतेचा आदर्श निर्माण करणाऱ्या गावांना सन्मानित करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सारख्या स्पर्धांची निर्मिती केली आहे. या स्पर्धेअंतर्गत गावात स्वच्छता ठेवणे, कचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणे, निर्जंतुकीकरता वेळच्यावेळी फवारणी करणे व ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत जनजागृती करणे या निकषांवर गुण दिले जातात.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत संत तुकडोजी महाराज स्वच्छता ग्रामीण स्पर्धेत वरील निकषांवर सातत्याने खरे उतरणाऱ्या ग्रामपंचायत मुंढर-कातकिरीस यंदाच्या वर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धा अंतर्गत जिल्हास्तरावर विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्याबद्दल आमदार, भास्करराव जाधव यांच्या शुभहस्ते गुहागर पंचायत समितीच्या आमसभेत मुंढर-कातकीरी गाव, ग्रामस्थ व ग्रामपंचायतीस लोकप्रतिनिधी मुंढर गावच्या सरपंच अमिषा गमरे व ग्रामसेवक सुरेश गोरे यांना सन्मानित करण्यात आले. सदर सन्मानामुळे जिल्हा व तालुका स्तरावर मुंढर-कातकरी ग्रामपंचायतीच्या कार्याची प्रशंसा होत असून गावातील स्वच्छता व सामाजिक विकासासाठी त्यांच्या योगदानाकडे आदर्श म्हणून पाहिले जात आहे. ग्रामपंचायतीच्या प्रामाणिक व पारदर्शक कार्यप्रणालीमुळे आणि स्वच्छता अभियानातल्या सातत्यपूर्ण योगदानामुळे हा विशेष पुरस्कार प्राप्त झाल्याचे मानले जात आहे.