रत्नागिरी- सरकारी कामकाजातील लेखापरीक्षण अहवालातील २१ प्रलंबित मुद्द्यांची पूर्तता करून अहवाल देण्यासाठी २५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या रत्नागिरीतील स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयातील तीन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे. यामध्ये एक वर्ग-१ अधिकारी, एक शिपाई आणि जिल्हा परिषदेतील एका सहाय्यक लेखा अधिकाऱ्याचा समावेश आहे. त्यांच्याकडून १६ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले असून, या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सरकारी अधिकारी सरकारी कर्मचाऱ्यांकडे अशाप्रकारे लाच मागताना पकडल्याने हा विषय सध्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात चर्चेचा बनला आहे.
एका ५५ वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली होती, जे पंचायत समिती दापोली येथे सहाय्यक लेखा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यालयाचे लेखापरीक्षण स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयामार्फत करण्यात येते. सन २०२०-२१ आणि २०२१-२२ या आर्थिक वर्षातील लेखापरीक्षण अहवालातील २१ प्रलंबित मुद्द्यांची पूर्तता करून त्यांनी ५ ऑगस्ट २०२५ रोजी अनुपालन अहवाल सादर केला होता. या अहवालानंतर त्यांनी ५ ऑगस्ट रोजी सहाय्यक संचालक शरद जाधव आणि कंत्राटी शिपाई सतेज घवाळी यांची भेट घेतली. यावेळी, अनुपालन अहवालानुसार २१ मुद्दे वगळून अंतिम अहवाल (एफआर) देण्याकरिता जाधव यांच्या वतीने शिपाई घवाळी याने तक्रारदाराकडे २४ हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदाराने ११ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीने तातडीने सापळा रचून लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यावेळी, लेखापरीक्षण अहवालातील प्रलंबित २१ पैकी १५ मुद्दे वगळून अहवाल देण्यासाठी १६ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवण्यात आली. ११ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७.४६ वाजता, पंचांसमक्ष स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयात सापळा लावण्यात आला. यावेळी
एसीबीने अटक केलेल्या आरोपींची नावे शरद रघुनाथ जाधव (वय ५३, सहाय्यक संचालक, वर्ग-१, स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालय, रत्नागिरी), सतेज शांताराम घवाळी (वय ३८, शिपाई, कंत्राटी, स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालय, रत्नागिरी), आणि सिद्धार्थ विजय शेट्ये (वय ४५, सहाय्यक लेखा अधिकारी, वर्ग-३, वित्त विभाग, जिल्हा परिषद, रत्नागिरी) अशी आहेत.
सहाय्यक संचालक शरद जाधव यांच्या संमतीने कंत्राटी कर्मचारी सतेज घवाळी याने तक्रारदाराकडून १६ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारली आणि ती रक्कम सहाय्यक लेखा अधिकारी सिद्धार्थ शेट्ये यांच्याकडे दिल्यानंतर तात्काळ एसीबीच्या पथकाने तिघांनाही रंगेहाथ पकडले. या प्रकरणाची पुढील कारवाई भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७(अ) आणि १२ नुसार सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक सुहास रोकडे यांनी काम पाहिले. त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सपोफौ उदय चांदणे, पोहवा विशाल नलावडे, पोहवा संजय वाघाटे, पोहवा दीपक आंबेकर, पोशि हेमंत पवार आणि पोशि राजेश गावकर यांचा समावेश होता.