आईची नाळ जशी मुलाशी जोडलेली असते तसंच कोकण आणि शिवसेनेचे नातं. आजवर कोकणात अनेक पक्षांतरे झाली परंतु तळागाळातील शिवसैनिकांचा स्वर्गीय शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेच्या भगव्या झेंडयावरील विश्वास तसुभरही ढळला नाही व तो सदैव शिवसेनेच्या भगव्याखाली एकनिष्ठ राहीला. त्यामुळेच कोकणाच्या राजकीय कुरुक्षेत्राने शिवसैनिकांच्या रुपाने अनेक रत्न महाराष्ट्राला दिली.
शिवसेनेच्या जन्मापुर्वीपासुनच मा.बाळासाहेब ठाकरे यांनी वत्कृत्वाने व कर्तृत्वाने महाराष्ट्रातील जनतेवर अधिराज्य गाजवले. अनेक तरुण मराठी माणसाच्या हक्कासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या शिवसेना नावाच्या संघटनेत सामिल होत गेले. रत्नागिरीतील असाच एक तरुण मा.बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नितांत प्रेम करीत होता. सरकारी नोकरी असताना देखील शिवसेना नावाच्या चार अक्षरांमुळे सामाजिक कार्यासाठी मन सैरभैर होत होतं त्यामुळे सरकारी नोकरीत मन रमत नव्हते म्हणुन नोकरी सोडली व थेट शिवसैनिक म्हणुन रत्नागिरी जिल्ह्यात नावारुपाला आला त्याचे नाव ‘राजन प्रभाकर साळवी’.
पहिल्यांदा नगरसेवक पुढे नगराध्यक्ष म्हणुन सर्वोत्तम काम केल्यामुळे स्वर्गीय मा.बाळासाहेब ठाकरे व मा.उद्धवजी ठाकरे यांनी त्यांच्यावर सन २००० साली रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड ते राजापूर यात विस्तिर्ण अशा नऊ तालुक्यांच्या रत्नागिरी जिल्हाचा शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणुन मोठी जबाबदारी दिली. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरत राजन साळवी महाराष्ट्रातील कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात सर्वाधिक शिवसैनिकांची नोंदणी केली. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात त्याबद्दल त्यांचे दस्तुरखुद्द मा.बाळासाहेब ठाकरे यांनी पाठीवर थाप मारुन ढाल देत कौतुक करुन सत्कार केला. या काळात रत्नागिरी जिल्ह्यात ख-या अर्थाने सर्वांना सोबत घेऊन शिवसेनेची बांधणी या अवलियाने करुन रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनवला.
शिवसेनेची कोकणाशी नाळ जोडली आहे याचं कारण राजन साळवी यांच्यासारखे ‘मातोश्रीचा’ आदेश शिरसावंद्य मानुन सर्वसामान्य, गोरगरीबांना व अडल्या नडल्यांना आपला – परका असा भेदभाव न करता मदतीसाठी धावणारे आणि अरे ला कारे म्हणत भिडणारे शिवसैनिक कोकणात आहेत म्हणुन शिवसेनेबद्दल कोकणातील जनतेला आदर आहे.
शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणुन काम करतानाचा असाच एक प्रसंग, राजन साळवी आपला चालक अजा शिवलकर सह रात्रौ राजापूरहुन कार्यक्रम आटोपुन रत्नागिरीच्या दिशेने येत होते. रत्नागिरी जवळील हातखंबा येथे एक अपघात घडला होता. गाडीतील सर्व प्रवाशी मयत झाले होते. एक पाच ते सहा महिन्याचे बाळ या मोठ्या अपघातातुन वाचले होते. संपुर्ण कुटुंब मृतावस्थेत पडलेले असताना त्या बाळाच्या रडण्याच्या आवाजाने अपघात पाहणा-यांच्या काळजात दु:खाचा काहुर माजला होता. राजन साळवी साहेबांनी गाडी बाजुला लावली. अपघातात वाचलेले ते बाळ उचलुन घेतले. तेवढ्यात पोलीस आले कायदेशीर मृतदेह ताब्यात घेतले. साहेब लहान बाळासह रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये गेले. त्या लहानग्या बाळाला मृत्यु म्हणजे काय माहित असणार ? त्याची आई मृत झाली होती. त्याचे छत्र हरवले होते. त्या बाळाला भुक लागलेली असल्याने ते टाहो फोडुन रडत होते. मध्यरात्री त्याची भुक भागवण्यासाठी रुग्णालयातील प्रशासनाकडे काहीही सोय नव्हती. अंगावरचे दुध पिणा-या बाळाला शांत कसे करणार हा प्रश्न उपस्थितांना सतावत होता. जिल्हाप्रमुख राजन साळवी यांना त्या बाळाचे अश्रु स्वस्थ बसु देत नव्हते. दुधासाठी ते बाळ करत असलेल्या आर्त किंकाळी सोबत त्याच्या डोळ्यातुन वाहणा-या अश्रुंनी बाळासाहेबांचा हा करारी ढाण्या वाघाचे काळीज असलेला शिवसैनिक अस्वस्थ होत होता. त्यांच्या जीवाची घालमेल होत होती. म्हणतात ना प्रत्येक पुरुषात आईचे वात्सल्य असते. अचानक राजन साळवी आपल्या घरी गेले. मध्यरात्री आपले मोठे बंधू दिपक साळवी यांना उठवुन प्रसंग सांगीतला. नेमका त्याच वेळी बंधू दिपक साळवी यांना मुलगा झाला होता. बंधू दिपक साळवी यांनी आपल्या पत्नी सौ.अनुराधा यांना झोपेतुन उठवले व आपल्या लहान बाळासारखीच एका अनाथ झालेल्या बाळाला दुधाची गरज आहे असे सांगीतले. त्या माऊलीने क्षणाचाही विचार न करता आपल्या पती व दिरासोबत दवाखान्यात आली. त्या मातेने जाती पातीचा कसलाही विचार न करता त्या क्षणी त्या निरागस बाळाची आई होवुन आपल्या अंगावरचे दुध पाजले व त्या लहानग्याची भूक भागवली. आई कुणाचीही असो ती जगात सर्वशक्तिशाली असते हे त्यांनी दाखवुन देत ते आपलेच बाळ समजुन त्या मातेने त्याची दुधाची तहान भागवली. एका शिवसैनिकाच्या पाठीशी त्याचे कुटुंब किती ठामपणे उभे राहते याचे उत्तम उदाहरण. मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी राजन साळवी यांचे कुटुंबही किती भारलेले आहे हे त्या रात्री रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपस्थितांनी पाहीले. आजही या प्रसंगाची आठवण सांगताना राजन साळवी यांच्या अंगावर शहारे येतात व डोळ्यात नकळतपणे पाणी दिसते. म्हणुनच मी म्हणतो की , शिवसेना ही राजन साळवी यांच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकांमुळेच कोकणात टिकली आहे अन् ती येणा-या काळातही टिकुन राहील.
असे एक ना अनेक प्रसंग राजन साळवींच्या आयुष्यात आले त्या सर्व प्रसंगांना प्रत्येकवेळी धिटाईने सामोरे जात त्यांनी ते प्रसंग परतवुन लावले. सध्या जगभरात कोरोना विषाणुने काहूर माजवलेला असताना घरात बसेेेल तो शिवसैनिक कसला असे म्हणत आपल्या सहका-यासमावेत आमदार राजन साळवी यांनी आपला राजापूर लांजा साखरपा हा अखंड मतदारसंघ पिंजुन काढत आपल्या मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायतीला भेट दिली व लोकांच्या समस्या व अडचणी समजुन घेतल्या त्यावर उपाययोजना केल्या. मला वाटतं राजापूर लांजा चे आमदार राजन साळवी सोडल्यास महाराष्ट्रातील उर्वरीत २८७ आमदारांपैकी कोणीही लोकप्रतिनिधी छातीठोकपणे सांगु शकत नाही की मी माझ्या मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतींना भेट दिली व समस्या समजावुन घेतल्या. आमदार साळवी यांनी याच अडचणीच्या काळात पक्षभेद न पाहता जो अडचणीत आहे त्याला किराणा सामान देवुन कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेत तब्बल १५ टन किराणा सामानाचे वाटप मतदारसंघात केलेे सोबतच आपल्या आमदार निधीतुन कोरोना योद्धांसाठी विशेष बाब म्हणुन प्रशासनाला लाखो रुपये दिले.
कपाळी भलामोठा भगवा टिळा हि जुन्या शिवसैनिकांची ओळख आहे. राजन साळवींनी ती ओळख आजही जपली आहे. त्यांच्या कपाळावरील भगवा टिळा पुसला गेला तरी वर्षानुवर्षे शिवसैनिक म्हणुन टिळा लावलेल्या कपाळावर शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व मातोश्रीचा आदेश शिरसावंद्य मानणा-या निष्ठावान व प्रामाणिक शिवसैनिकाचा टिळ्याच्या आकाराचा काळसर व्रण त्यांच्या कपाळी आता ठळकपणे दिसतो.
एक जुना शिवसैनिक म्हणुन एकाच गोष्टीची खंत वाटते की, सलग दुस-या वेळी सत्ता असताना पक्षनेतृत्वाने तळागाळातल्या गोरगरीबांसोबत रमणा-या या कडवट शिवसैनिकाला मानाचे पान देवुन सलग तीन वेळा निवडून येणा-या व निवडून देणा-या शिवसैनिक व मतदारांचा सन्मान करायला हवा होता परंतु आमदार साहेब मोठे मन करुन नेहमीच म्हणतात की, सत्ता आज आहे उद्या नसेलही पण मा.बाळासाहेबांनी दिलेले शिवसैनिक हेच माझे मोठे पद आहे. साहेबांचा हाच मोठेपणा आज स्वपक्षीयच नव्हे तर त्यांच्या राजकीय विरोधकांमध्येही त्यांच्याविषयी आपुलकी व ह्रदयात अढळ स्थान निर्माण करतो.
स्वर्गिय मा.बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे, युवासेनाप्रमुख व कॅबिनेट मंत्री मा.आदित्यजी ठाकरे या ठाकरे घराण्याच्या तीनही पिढ्यासोबत एकनिष्ठपणे राहुन काम करणा-या या कडवट शिवसैनिकाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन ईश्वर त्यांना आरोग्यसंपन्न उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना करतो.