
चिपळूण : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांना ७८ वा अभिष्टचिंतन सोहळा रविवार दि. ७ सप्टेंबर रोजी बहादूरशेख नाका येथील सहकार भवन येथे साजरा केला जाणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांचा सत्कार सोहळा समारंभ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरी करत असताना दि. १९ ऑक्टोबर १९९३ रोजी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली. पहिल्या दिवसापासूनच आर्थिक व्यावसायिकता पाहताना पारदर्शकतेने कारभार करताना सुलभ पद्धतीने कर्जपुरवठा करण्यावर भर दिला. यातून संस्थेची दिवसेंदिवस वृद्धी होत गेली आणि आता या संस्थेच्या ५० शाखा असून सर्व शाखांमध्ये यशस्वीपणे कारभार सुरू आहे. संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य अधिकारी व कर्मचारी वर्ग संस्थेच्या यशस्वी वाटचालीसाठी मेहनत घेत आहेत.
चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांचा वाढदिवस म्हणजे सर्वासाठी आनंदाची पर्वणीच असते. सहकाराला वाहून घेतलेले नेतृत्व सुभाषराव चव्हाण यांचा वाढदिवस रविवार दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता बहादूरशेख नाका येथील सहकार भवनमध्ये साजरा केला जाणार आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांचा सत्कार होणार आहे. सकाळी १०.३० ते १२ वाजेपर्यंत सहकार कार्यशाळा, त्यानंतर दुपारी १ वाजता सुभाषराव चव्हाण यांचा अभिष्टचिंतन सोहळा होईल. तरी या सोहळ्यासाठी संस्थेचे सर्व सभासद, हितचिंतक, ठेवीदार व सहकारातील कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.