पहिल्याच पावसात गुहागर – विजापूर रस्त्याच्या क्राँक्रीटला तडे

0
529
बातम्या शेअर करा

गुहागर –रुंदीकरण करताना रस्त्यावर झालेला मातीचा चिखल, वाहने घसरण्याचे प्रकार, मोऱ्यांची कामे अर्धवट, लाँकडाऊनमध्ये सुरु असलेले काँक्रीटचे काम, रुंदीकरणात अंतर्गत जोडरस्त्यांची झालेली वाताहत, नेहमीच वादातीत असलेला व बांधकामाविना रखडलेला मोडकाघर पूल आधी कारणांनी चर्चेत असलेल्या विजापूर-गुहागर तीनपदरी रुंदीकरणाचे काम सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले समोर येत आहे. रुंदीकरण झालेल्या सीमेंट काँक्रीटच्या या रस्त्याला पहिल्याच पावसात तडे गेल्याचे दिसून येत आहे. चिपळूण-गुहागर मार्गावर मार्गताम्हाने पाँवरहाऊस दरम्यान, हे तडे गेलेले आहेत. वाहनचालक, प्रवाशांना या निकृष्ट कामाचे दररोज दर्शन घडत असून यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विजापूर-गुहागर तीनपदरी रस्ता रुंदीकरणाचे काम मार्गताम्हाने येथून सुरु झाले. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याच्या एका बाजूचे काँक्रीटीकरण देवघर, गिमवी व त्यापुढे चिखलीपर्यंत करण्यात आले. मात्र, हे करताना ठेकेदाराने रस्त्याच्या दोनही बाजू उकरुन रुंदीकरणाचे काम हाती घेतले होते. मात्र, प्रत्यक्षात काँक्रीटीकरण एका बाजूनेच केले. साहजिकच लाल मातीच्या धुळीचा सामना वाहनचालक, प्रवासी यांना त्या दरम्यान करावा लागला होता व वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाल्याने ठेकेदाराला या सर्वांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. उकरलेल्या रस्त्यावर नियमित पाणीच मारले जात नसल्याने हा प्रकार उद्भवल्याची ओरड सुरु होती. त्यावेळेपासूनच रुंदीकरण वादाच्या कचाट्यात सापडले होते.

एका बाजूचेच रुंदीकरणाचे काम हाती घेतलेल्या ठेकेदाराच्या कामात यानंतर विघ्न आले ते लाँकडाऊनचे. मार्च ते मे असे तीन महिने रुंदीकरणाचे काम ठेकेदाराला बंद ठेवावे लागले. त्यामुळे उकरलेल्या दुसऱ्या बाजूच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले. मात्र, त्यावेळी एसटी व इतर वाहतूक सेवा बंद असल्याने याचा फारसा त्रास प्रवासी, वाहनचालकांना झाला नाही. अखेर जून महिन्यापासून या रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरुवात झाली. भर पावसात सुरु असलेले हे रुंदीकरण सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. कारण यानंतर थोड्याप्रमाणात वाहतुकीला सुरुवातही झाली होती. मार्गताम्हाने ते देवघर या दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण दोनही बाजूने करण्यात आले. मात्र, पावसाळ्यात झालेले हे रुंदीकरण ‘आँखो देखा हाल’ असे ठरले आहे.

मार्गताम्हाने पाँवरहाऊस म्हणजे सबस्टेशन दरम्यान, या रुंदीकरणाच्या काँक्रीटला मोठे तडे गेलेले दिसून येत आहेत. मध्येच समांतर रेषा तर आडव्या-तिडव्या अशा रेषा माराव्यात तशाप्रकारचे तडे गेलेले असल्याने या बांधकामाच्या निकृष्ट दर्जाचे दर्शन वाहनचालक व प्रवाशांना होत आहे. असेच रुंदीकरणाचे काम जर यापुढील भागात झाल्यास गुहागरकडे जाणारा हा पर्यटन विकासाचा मार्ग बकवास ठरणार आहे. त्यामुळे आतापासूनच लोकप्रतिनिधी, सामाजिक, राजकीय संघटना यांनी याकडे लक्ष देऊन या निकृष्ट कामाची दखल घ्यावी व हे काम ठेकेदाराच्या निदर्शनास आणून द्यावे, अशी मागणी वाहनचालक व प्रवाशांनी केली आहे.

गुहागर-विजापूर महामार्ग रुंदीकरणामुळे गुहागरच्या पर्यटनाला चालना मिळेल असा सर्वांचाच पूर्वीपासून समज आहे व तो खराही आहे. कारण शृंगारतळी ते गुहागर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी धरणे, आंदोलने होत असत. मात्र, हा रस्ता कधीच चांगला झाला नाही. निदान रुंदीकरणामुळे तरी गुहागरचा प्रवास सुकर होईल, अशी आशा आजही सर्वांना आहे. त्यातच मोडकाघर पुलाच्या उभारणीचे घोंगडे भिजतच आहे. त्यावेळच्या एन्राँन कंपनीमुळे दोन पदरी डांबरीकरण रस्ता चिपळूण-शृंगारतळी असा करण्यात आला. तो आजतागायत चांगलाच होता. कुठेही त्याला खड्डे पडले नव्हते. मात्र, काँक्रीटच्या रस्त्यावर तडे गेलेले पाहून अनेक वाहनचालक व प्रवाशांनी पूर्वीचाच रस्ता बरा होता, अशी प्रतिक्रिया खासगीत बोलताना दिली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here