चिपळूण – चिपळूण तालुक्यातील चिवेली हे गाव पंचक्रोशीतील महत्त्वाचे गाव आहे. मात्र, सध्या चिवेली गावात अंतर्गत कलह, ग्रामपंचायतील विकास कामांमधील भ्रष्टाचार, बेशीस्त कारभार आणि केले जाणारे राजकारण यामुळे चिवेलीत ‘बळी तो कान पिळी’ या उक्तीप्रमाणे सध्या गावात धुमशान सुरु आहे.
ग्रामपंचायतमधील अनेक प्रकारच्या भ्रष्टाचारबाबत काही जागृत ग्रामस्थांनी विभागीय आयुक्त कोकण विभाग कार्यालयातील उपाययुक्त (आस्थापना) डॉ. अविनाश गोटे व अन्य शासकीय कार्यालय यांच्याकडे सागर शिर्के, सिद्धेश शिर्के, मुबिन म्हालदार व अन्य ग्रामस्थांनी अर्ज करून संबंधितांवरती कारवाई व्हावी, अशी मागणी लेखी पत्रकाद्वारे केली आहे.
गेल्या काही वर्षापासून चिवेलीत झालेल्या विकास कामांमधील भ्रष्टाचाराबाबत आता उघडपणे काही ग्रामस्थ बोलू लागले आहेत. ग्रामपंचायतमधील अनेक कामांची माहिती आता उघड झाल्याने याबाबत काही ग्रामस्थांनी मुख्यकार्यकारी अधिकारी रत्नागिरी व संबंधीत सर्व कार्यालये अधिकारी यांच्याकडे गेले वर्षेभर पत्रव्यवहार व गाठीभेटी घेऊन न्याय मागत आहेत. परंतु, अद्याप महत्त्वांच्या विषयांबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही ग्रामस्थ सागर श्रीकृष्ण शिर्के, सिद्धेश रवींद्र शिर्के, मुबिन इस्माईल म्हालदार व अन्य ग्रामस्थांनी कोकण विभागीय आयुक्त उपआयुक्त (आस्थापना) डॉ. अविनाश गोटे यांच्याकडे सुद्धा याबाबत पत्रव्यवहार केला आहे..
चिवेली गावातील राष्ट्रीय पेयजल योजनेतून झालेल्या सुमारे ४० ते ४२ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये चर्चेला येऊन सर्वत्र गाजत आहे. या प्रकरणात एकवेळ प्रशासकीय चौकशी होऊन आढलेल्या गैरप्रकारानंतर जिल्हा परिषदेकडून तांत्रिक समितीची नियुक्ती करण्यात आली. सदर समितीने डिसेंबर २०२१ च्या पहिल्या आठवड्यात संपुर्ण पाणी योजनेची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी तक्रारदार, शासकीय अधिकारी, काही ग्रामस्थ व मजूर यांच्या उपस्थितीत या योजनेची पाईपलाईन जुनीच असून ती ठरल्याप्रमाणे बदलण्यात आलेली नाही,अशी माहिती समोर आली. त्यानंतर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी २०२१ रोजी झाली. मात्र यावेळी काही जणांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून पुर्वीची असणारी मतदान केंद्रे बदलण्याचा प्रयत्न केला. या निवडणूकीची सदोष प्रभाग रचना, पुर्वी असलेली मतदार केंद्रे रद्द करणे व गावातील शिर्केवाडी व तांबडवाडी या मतदारांना ६ किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर मतदार केंद्र देणे या चुकीच्या गोष्टींबद्दल गावातील सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष रमेश शिर्के यांनी ९ फेब्रुवारी २०२१ रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी व कोकण आयुक्त यांना पत्र देऊन माहिती कळविली आणि योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती केली. परंत, अद्याप याबाबत कोणतेही कार्यवाही झालेली नाही.
आदर्श विद्यामंदीर चिवेलीच्या व्यायाम शाळा इमारतीचा घोटाळा सुद्धा उघड होऊन संबंधितांनी जिल्हा क्रिडा अधिकाऱ्यांकडे व्यायाम शाळा बांधकामाची रक्कम व्याजासहीत भरली. व्यायाम शाळेचे प्रकरण सुद्धा तालुक्यात गाजले आहे. ग्रामपंचायत निवडणूकीनंतर पहिलीच ग्रामसभा दि. ७ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. यासभेचे अध्यक्ष सरपंच व पंचायत समितीचे सदस्य नंदकिशोर शिर्के आणि एक ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रचंड हंगामा करून चिवेली पंचक्रोशी विकास मंडळाचे अध्यक्ष रमेश शिर्के यांच्या अंगावर धावून जाण्याचा व दमदाटी करण्याचा प्रकार केला. अशी माहिती संबंधित तक्रारदार यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे. त्यानंतर चिवेली गावठाणवाडी मुख्य रस्ता ते रमेश शिर्के घरापर्यंतच्या १५० मीटर लांबीच्या वाडी रस्त्याला गटार न काढताच रक्कम खर्च झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशा अनेक गोष्टी ग्रामपंचायतमध्ये घडल्याने चिवेलीतील वातावरण सध्या कलहाचे बनले आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे उघड झालेल्या विकास कामांमधील भ्रष्टाचाराबाबत पत्रव्यवहार करून सुद्धा अद्याप सक्षमपणे कोणतीच कार्यवाही केली गेलेली नाही. वरील सर्व पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीची अत्यंत पारदर्शक चौकशी व तपासणी करावी. या ग्रामपंचायतीवर एका सक्षम अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नियुक्ती करून संपुर्ण कारभार निपक्ष पद्धतीने करण्यात यावा, अशी आग्रहाची मागणी ग्रामस्थांनी उपाययुक्त श्री. गोटे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.