भारतीय सिनेसृष्टीला सुवर्ण काळाकडे नेणारे आणि रसिक प्रेक्षकांचे हृदयातील दिग्गज अभिनेते राजसाब ,देवसाब आणि दिलीपसाब यातील शेवटचा तारा देखील निखळला आणि खऱ्या अर्थाने चित्रपट सृष्टीचा एक अध्याय समाप्त झाला असं म्हटल्यास वावगे होणार नाही. शरीराने तिघेही या जगात नसले तरी ते चिरंजीव आहेत, राहणार आहेत सिनेसृष्टी या भूतलावर असे पर्यंत प्रेरणा देण्यासाठी.
ज्यांच्या सोबत काम करण्याची मिळणारी संधी सिनेसृष्टीतील आजच्या दिग्गज अभिनेत्यांना सुद्धा आपलं भाग्य वाटायचे असं व्यक्तिमत्व, अनेक उत्तुंग कलाकार, आपला माणूस पाच दशकांहून अधिक बॉलीवूड मध्ये आपल्या कसदार अभिनयाचा दबदबा निर्माण करणारे महान कलाकार दिलीप कुमार साहेब यांचं जाण वयोमानाने जरी असल तरी चटका लावणार आहेच. मनाला वेदना देणार आहे. सिनेसृष्टीची फार मोठी हानी झालेली आहे. दिलीप कुमार यांनी आपल्या सहज, सुंदर,आगळ्यावेगळ्या अभिनयाच्या विविध कंगोर्यातून यांनी रसिक मनावर केवळ राज्यच केले नाही तर प्रत्येकाच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलं, रसिक मनात कायम कोरून ठेवल आहे.
ज्वारभाटा सिनेमाद्वारे पदार्पण करून पन्नास वर्षाच्या कालखंडात त्यांनी अनेक चित्रपटातून आपल्या प्रत्येक भूमिका लक्षणीय केल्या. जुगनू, शहीद, मधुमती, देवदास, मुगले आजम, गोपी, यादगार, क्रांती, त्रिशूल आजही हे चित्रपट जसेच्या तसे नजरेसमोर येतात आणि हृदयात रुतत जातो सिनेसृष्टीला हा दिग्गज महानायक. त्यांच्या चित्रपटांची नाव तरी किती घ्यायची, त्यांच्या अभिनयाने सजलेला प्रत्येक चित्रपट म्हणजे एक एक टपोरा मोती, लखलखता हिरा, याचा विसर कसा पडेल. सहज, सुंदर अभिनय, वैशिष्ट्यपूर्ण संवादफेक, भूमिकेतील लहानातील लहान कंगोरे शोधून लक्षवेधी करणे, गंभीर तितक्याच विनोदी भूमिकांना सहजतेने यशोशिखरावर नेणारा, व्यक्तिरेखेचा स्वभाव स्वतःमध्ये भिनवायची जबरदस्त ताकद असणारा, कला जीवनात नियतीने ज्याच्यावर कायमच वरदहस्त ठेवला होता असे महान व्यक्तिमत्व दिलीपकुमार यांना भावपूर्ण आदरांजली.
विश्वनाथ पंडित