चिपळूण – सरकारी योजनेतून शिलाई मशिन देतो असे सांगून चिपळूण व गुहागर तालुक्यातील शेकडो महिलांची सुमारे 3 लाख 66 हजार रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याविषयी संबंधीत महिलांना पोलिसात तक्रार अर्ज सादर केला आहे. त्याप्रमाणे येथीलपोलिसांनी एकास ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे.या प्रकरणी गुहागर तालुक्यातील देवघर येथील सुभाष सकपाळ यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याविषयी मनिषा खेडेकर, श्रेया पाटेकर, रूचिता कदम, स्वरा घारे, रिया देवळेकर आदी महिलांना पोलिसांकडे तक्रारअर्ज दिला आहे.
चिपळूणातील 424 महिलांकडून 3 लाख 65 हजार 970 रूपये घेतल्याचे या तक्रारीत नमुद केले आहे.याविषयी संबंधीत महिलांनी माहिती देताना सांगितले की, सरकारी योजनेतून 600 ते 1700 रूपयांच्या मोबदल्यात खास महिलांसाठी शिलाई मशिन देण्याचे अमिष दाखवले होते. अवघ्या 25 दिवसांच्या कालावधीत शिलाई मशिन उपलब्ध करून देण्याचे सकपाळ याने कबूल केले होते. मात्र 4 महिने उलटूनही शिलाई मशिन महिलांना मिळाली नाही. याविषयी विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर मशिन वाटपासाठी संबंधीत महिलांना 15 डिसेंबरची तारिख देण्यात आली. त्यानुसार पैसे जमा केलेल्या महिला हॉटेल अतिथी शेजारील एका खासगी कार्यालयात धडकल्या. मात्र त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी रूद्रावतार दाखवत प्रसादही दिला. या गोंधळाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सकपाळ याला ताब्यात घेत तत्काळ चौकशी सुरू केली आहे.
सकपाळ याचे काम एका बिल्डरच्या कार्यालयातून सुरू होते. त्यामुळे तो बिल्डर कोण, ..? त्याचा या व्यक्तीशी काय संबंध आहे, याविषयी देखील पोलिस चौकशी करत आहेत. सकपाळ हा मुळचा गुहागर तालुक्यातील देवघर येथील रहिवासी असला तरी तो सध्या चिपळूण बाजारपेठेतील वडनाका येथे वास्तव्यास आहे. चौकशीनंतर पुढील कार्यवाही सुरू केली जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली.
















