समाजात एक पोलीस अधिकारी म्हणून काम करीत असताना अनेक लोकांशी संपर्क होतो.. यात अनेक प्रकारची लोक असतात. कोणी सच्चे, कोणी लुच्चे, गरीब,श्रीमंत, समाजाची जाणीव असणारे, तर काही उगाच आव आणणारे,काही फसवणारे,काही शक्तीचे प्रदर्शन करणारे,काही स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी धडपडणारे….नाना प्रकारची लोक पाहतो… पण याउपरी, प्रेमळ, विश्वसनीय,आनंदी,परोपकारी, समाजभान आणि कुटुंबवत्सल असणारे गुणी लोक पण पाहतो..परवाच माझा एक गावाकडचा एक मित्र आला.. तो पी एस आय झाल्यापासून नेहमी संपर्कात आहे.. गुणी आणि शांत असा दीपक कदम मला ऑफिसमध्ये भेटायला आला..दीपक ने फार कष्टाने ही पोस्ट मिळवली होती..दहावीला एक्केचाळीस टक्के,बारावीला नापास… याच वर्षी वारणानगर कुस्ती केंद्रात पैलवान असणारा भाऊ 35 फुटावरून पडून आयुष्यभरासाठी अपंग झाला.. म्हणून बापाने याला मनाविरुद्ध तालमीत घातले. पण तालमीत अपेक्षित यश मिळत नसल्याने,आणि घरांची आर्थिक परिस्थिती बिघडल्याने तालीम सोडून दिली..शेतात घाम गाळला.. अभ्यासामध्ये डोकं चालत नसताना अभ्यास चालू केला..2006 ला पोलीस शिपाई म्हणून भरती झाला.कविता सोबत लग्न केले.सलोनी नावाची छान मुलगी झाली..2013 ला 5 व्या प्रयत्नात पी. एस. आय. झाला.ट्रेनिंगला जाण्यापूर्वी दोन जुळी मुले झाली.ट्रेनिंग पूर्ण झाले आणि रत्नागिरी ला जॉईन झाला..
इथपर्यंत सगळं सुखानं मांडून ठेवलेल्या गोष्टींसारखं झाले.. पण नियती वाईट असते.. आणि कधी कधी ती इतकी रुसते की माणसाच्या मनाच्या चिंध्या उडतात.. घरं कोलमडून पडतात….ती एकाच वेळी एवढ्या संकटांना पाहुणी म्हणून पाठवून देते…की माणूस खंगुण जातो.. चिंताग्रस्त होतो.. असंच झाले.. दीपक वर नियती रुसली होती… पुरुष काम करतो.. आव्हाने सहज पेलतो.. घर उभा करतो.. हे करत असताना त्याची पत्नी घर, मुलं बाळ सांभाळते.. पण या सगळ्या राहटगाडयात ती स्वतः कडे मात्र दुर्लक्ष करते.. असंच दीपक च्या पत्नी बाबत झाले. कविताचे डोके अचानक दुखायला लागले म्हणून डाॅक्टरांचा सल्ला घेवुन एम आर आय केला. तेव्हा लहान मेंदूला पाच सेंमी ची गाठ असल्याचे समजले व गाठी मुळे डोक्यातील पाण्यात प्रोटीनचे प्रमाण जास्त होवुन पाण्याचा थिकनेस वाढुन पाणी वाहून नेण्याची नस ब्लॉक झाली.मेंदू वर दाब वाढुन मुत्यूची शक्यता निर्माण झाली होती.ऑपरेशन शिवाय पर्याय न्हवता.. दीपक ला त्याची सुंदर,सुशील आणि प्रेमळ पत्नी दिसत होती.. जिच्या समोर मृत्यू उभा आहे.. तिला घेऊन जाण्यासाठी.. आणि तिला ओढतयात तिची तीन लहान बाळ.. साडेचार वर्षाची अजाण मुलगी आणि दीड वर्षची जुळी मुले..माहीत नाही या मुलांच्या मनात काय चालू आहे.. जिची सावली म्हणून जन्माला आलो.. ती सावली नियती हिरावून घेते की,जन्मभरासाठी पोरखे करते की,आयुष्याची राखरांगोळी करते..दैव जाणे…
तेरा तासाचे अतिशय क्लिष्ट असे ऑपरेशन करून महंत प्रयत्नांनी डॉक्टरांनी यमाला रिकाम्या हातानी माघारी घालवले…. पण दीपक च्या हाती दिली अशी पत्नी.. जी बोलू शकत नाही, जिचे स्वतःवर नियंत्रण नाही, जिला समोर कोण आहे.. हे समजत नाही.. जिने नऊ महिन्याच्या मरण कळा सोसून ज्या पिलांना जन्म दिला.. त्या पोरांना ती ओळखेना.. देव एवढा निष्ठूर ? एक महिना काढला.. आजीनं पोराचा सांभाळ केला.. आईला काय झाले या प्रश्नाचे उत्तर देताना आजीला काय बोलायचे ते कळत न्हवते. चिमुकल्याना घेऊन फक्त आसवं गाळायची..हसतमुख पत्नीची ही दुर्दैवी अवस्था पाहून दीपक रात्र रात्र भर डोळ्यांतून रक्त येईपर्यंत रडत असे.. निष्पाप मुलाच्या कडे बघून हा बाप कळवळून जात असे.एक महिन्यानंतर हॉस्पिटल मधून दोन्ही हातात उचलून बायकोला घेऊन गेला.. हे सगळं करीत असताना नोकरीची काळजी बरोबर पॊरांची पण काळजी होती..गेल्या महिन्यापासून पॊरांची आबाळ झाली होती.. कविताच्या प्रकृती मध्ये आता फरक पडणार न्हवता.. हे ओळखून तिचे आई बाप टाकून गेले.. त्यांनी आजपर्यंत साधी विचारपूस केली नाही.. हा क्षण बिकट आहे.. आज खरी नात्याची गरज असताना सर्वानी तोंड वळवले.पण दीपक हरला नाही.. सर्व बाजूनी दश दिशा हरत असताना हा डगमगला नाही.. पॊरांची काळजी घ्यायला आई सोबत होती.. पण ती ही वयोमानानुसार आजारी,तरीही नातवंडांसाठी स्वतः च आजरपण बाजूला ठेवले.. आणि पोरांचा सांभाळ केला.. पोलीस खात्यातला असल्याने दीपक ला तरी किती सुट्टी आणि सहानभूती मिळणार.. तपास, बंदोबस्त, मोर्चे, चोऱ्या माऱ्या, रात्र गस्त हे सगळं करीत त्याने पत्नीची काळजी घेतली.आणि कामात पण दुर्लक्ष केले नाही..सुरवातीला चार महिने काही ही न बोलणारी कविता थोडं समजू लागली.. एखादा शब्द बोलू लागली.. पोरं जेंव्हा स्वतःच्या ताटातील घास आई तू पण खा की ग.. असे म्हणू लागली.. तेंव्हा पॅरॅलीस झालेल्या कवितांचा हात उचलत न्हवता.. पण तिच्या डोळयातून अश्रू मात्र न सांगता ओघळत होते..
आज या गोष्टींला तीन वर्षे झाले आहेत.. तीन वर्षत दीपकला नातेवाईकांनी तीनशेवेळा दुसऱ्या लग्नाचा सल्ला दिला असेल.. पण तो त्याला तयार नाही.. उलट पत्नीला जगण्यासाठी प्रोत्साहन देतो.मला यातून बाहेर पडायचे आहे.. हे कविताकडून वदवून घेतो.. तिचे सगळं करतो.. लहान बाळासारखं, सावली सारखा जपतो..न बोलणारी कविता आता थोडं थोडं बोलते.. बिछान्यावर खिळून राहिलेली कविता आता उभी राहते.. दुडू दुडू पळते.. अडखळते, परवा तर तिच्या हाताचे हाड पडल्यावर मोडले आहे.. पण प्रयत्न करते.. याही परिस्थिती वर मात करून परवा तिने सात किलोमीटर ची मॅरेथॉन इतरांपेक्षा बऱ्याच वेळाने पूर्ण केली.. पण तिने पूर्ण केली.. तिचा तो विजय होता.. एक दिवस कविता 21 किलोमीटर ची मॅरेथॉन पूर्ण नक्की करेल.. कारण तिची इच्छा आहे.. मला माहित आहे.. त्या दिवशीही ती सर्वात शेवटी असेल.. पण तिच्या मागे नक्कीच असणार तिच्या वर मनापासून प्रेम करणारा तिचा पती दीपक………
हे सगळं जेंव्हा मला दीपक ने सांगितले, कविताचे तिच्या मुलांचे फोटो दाखवले.. तेंव्हा मलाच आतून गहिवरून आले.. एवढा चांगला माणूस असू शकतो का? हाच माझ्या मनात प्रश्न होता.. आणि त्याचे उत्तर हो असेच आले..तेंव्हा मला जग जिंकणाऱ्या सिकंदर पेक्षा स्वतः च्या बायकोला जिकण्यासाठी धडपड करणारा दीपक मोठा वाटला…
हा प्रयत्न अनेक संकटांनी बेजार झालेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे.. अनेक नवतरुणा साठी आहे… या जगात अनेक दीपक सारखी लोक आहेत.. जे आपल्या माणसासाठी प्रत्यक्ष देवाशी सामना करीत आहेत.. आणि देवालाही हरवत आहेत..