मार्गताम्हाने – घनदाट वृक्षराजी, वन्य प्राणी, पक्षी यांचा अधिवास, फेसाळणारे धबधबे, दुधडी भरुन वाहणारी बारमाही नदी असे
निसर्गसौंदर्य लाभलेले चिपळूण तालुक्यातील बोरगाव येथील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले स्वयंभू शंकराचे देवस्थान (महाबळेश्वर) ऐन श्रावणात परिसरातील भाविकांना खुणावते आहे. गावापासून दोन कोसभर दूर असलेल्या या नितांत, रमणीय परिसराला महाबळेश्वर सारखे थंड ठिकाण लाभले आहे. पर्यटनाचा ‘क’ दर्जा मिळालेल्या या स्थळाला भाविकांची अलोट गर्दी होत आहे.
चिपळूण-गुहागर मार्गावरील उमरोली चिवेलीफाटा येथून साधारणतः 9 कि.मी. असलेले बोरगाव येथील महाबळेश्वर हे ठिकाण गावापासून खूप दूर निर्जन ठिकाणी वसले आहे. या ठिकाणाला सर्वच भाविक महाबळेश्वर या नावाने ओळखतात. याचे कारण म्हणजे येथे होणारा निसर्गाचा व परमेश्वराचा सात्क्षाकार. बोरगाव गावापासून महाबळेश्वरला जायला रस्ता आहे. रस्त्याचे डांबरीकरण झालेले नसले तरी कच्चा रस्ता महाबळेश्वर मंदिरापर्यंत आपल्याला सहज सुखावून नेतो. रस्त्याच्या एका बाजूला घनदाट खोरे दुसऱ्या बाजूला विस्तीर्ण डोंगर. किती अनुपम सौंदर्य. महाबळेश्वर रस्त्याला आपण लागले की, घनदाट वृक्षराजी लागते त्यामुळे भाविकांना थोडे जागीच थबकल्यासारखे वाटते. आपण वाट तर चुकलो नाही ना अशीही भिती निर्माण होते. मात्र, महाबळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर कुठेही भाविक चुकत नाहीत.
महाबळेश्वर देवस्थानच्या कडेने मोठी नदी वाहते. गिमवी, देवघर या
गावांच्या नद्या या नदीला येऊन मिळतात. निर्जन व विलोभनीय हे ठिकाण असल्याने भाविकांना महाबळेश्वर देवस्थान नेहमीच खुणावताना दिसते. पुरातन, स्वयंभू शंकराची येथे पिंड असल्याने बोरगाव येथील ग्रामस्थांनी येथे मंदिर बांधले व येथील निसर्गसौंदर्य न्याहाळून या भागाला महाबळेश्वर असे नाव दिले. महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव भरतो. या भागाला गुहागर तालुक्यातील गिमवी, देवघर गावांच्या सीमा खेटून असल्याने या परिसरातील
भाविक पायवाटेने महाबळेश्वरला येतात. श्रावणमासात येथे दर सोमवारी होमहवन, अभिषेक असे कार्यक्रम पार पडतात. रामपूर भागातील भाविक महाबळेश्वर देवस्थानला अधिक पसंती देतात. महाबळेश्वर खूप दूर असल्याने वीज येथपर्यंत पोहचलेली नाही. मात्र, स्वयंभू शंकराच्या काळ्याकुट्ट अंधारातील गाभारा समईच्या प्रकाशात अधिक उजळून निघतो. मंदिरातील घंटेचा नाद परिसर दुमदुमतून टाकतो. मंदिर परिसरातील घनदाट वृक्षराजीतून पक्ष्यांचा मंजूर स्वर परिसर धुंद करुन टाकतो. मंदिराच्या मागील बाजूस असणारी नदी लहान-मोठ्या वाहणाऱ्या ओहळांनी व झऱ्यांनी सर्वांनाच आकर्षित करते.
महाबळेश्वर हा निर्जन परिसर असल्याने अद्याप येथे कोणतीही सोय-सुविधानाही. देवस्थानने येथे विहीर खोदून पाण्याची व्यवस्था तेवढी केलेली आहे. रस्ता अजून लाल मातीचा कच्चा आहे. येथे येणारे भाविक आपल्याबरोबर जेवण, भाकरीची व्यवस्था करुनच येथे येतात आणि निसर्गाच्या सानिध्यात येथे जेवण उरकतात. एक पिकनिक स्पाँट म्हणून महाबळेश्वर भाविकांच्या पसंतीत उतरले आहे. देवस्थानला पर्यटनाचा क दर्जा प्राप्त झालेला आहे. हे देवस्थान नावारुपाला आल्यास नक्कीच पर्यटकांना आकर्षित करेल, अशी अपेक्षा या देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश काताळकर यांनी व्यक्त केली आहे.
- पर्यटनदृष्ट्या विकसित होणे गरजेचे
बोरगाव महाबळेश्वरपासून चिवेली बंदर 10 कि.मी. आहे. चिवेली बंदर येथे खाडीमार्गे लहान-मोठ्या बोटींनी प्रवासी वाहतूक होते. त्यामुळे महाबळेश्वर नावारुपाला आल्यास चिवेली बंदराकडे किंवा दाभोळकडे ये-जा करणारा प्रवासी, पर्यटक येथे नक्की भेट देईल. तसेच चिपळूण-गुहागर मार्गावरुन गुहागरकडे जाणाऱ्या पर्यटकांना भेट देण्यासाठी हे जवळचे ठिकाण आहे. यासाठी महाबळेश्वरचा परिसर पर्यटनात्मकदृष्ट्या विकसनशील होणे गरजेचे असल्याचे मत येथील युवा सामाजिक कार्यकर्ते विक्रम विश्वनाथ साळुंखे यांनी व्यक्त केले.