कोल्हापूर – अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४६ व्या क्रीडा स्पर्धा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात दि. १७ ते १९ एप्रिल २०२५ या कालावधीत होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने ऍथलेटिक्स, कॅरम व व्हॉलीबॉल स्पर्धेचा समावेश आहे. या स्पर्धा महापारेषण, महानिर्मिती, महावितरण कंपनीच्या संयुक्त विद्यमाने होत आहेत. देशभरातून सुमारे एक हजार महिला व पुरुष खेळाडू यामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती महापारेषणच्या कराड परिमंडलाच्या मुख्य अभियंता तथा क्रीडा स्पर्धा आयोजन समितीच्या अध्यक्षा शिल्पा कुंभार यांनी दिली.
या स्पर्धेसाठी दिल्ली, हरियाणा, गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, तेलंगणा, बिहार, हिमाचल प्रदेश, टाटा पॉवर, पंजाब पॉवर, महापारेषण, महानिर्मिती, महावितरण कंपन्यांतील खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे उदघाटन गुरूवारी (दि.१७) सकाळी नऊ वाजता होणार आहे. अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला (भा.प्र.से.) प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र (भा.प्र.से.), शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, महावितरणचे संचालक (मानव संसाधन) अरविंद भादीकर, महापारेषणचे संचालक (संचलन) सतीश चव्हाण, संचालक (प्रकल्प) अविनाश निंबाळकर, संचालक (वित्त) तृप्ती मुधोळकर, संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे, संजय मारूडकर, प्रसाद रेशमे, भुजंग खंदारे, अनुदीप दिघे, बाळासाहेब थिटे, अभय हर्णे, योगेश गडकरी, डॉ. नितीन वाघ, परेश भागवत आदी उपस्थित राहणार आहेत.
कराड ; महापारेषण कराड आंतर -मंडलीय आयोजित नाट्यस्पर्धेत ‘पगला घोडा’ प्रथम तर बेस्ट कलाकार कौस्तुभ भालघरे
क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि.१९) सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. (भा.प्र.से.) व महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक उपस्थित राहतील.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महापारेषणच्या कराड परिमंडलाच्या मुख्य अभियंता तथा क्रीडा स्पर्धा आयोजन समितीच्या अध्यक्षा श्रीमती शिल्पा कुंभार, महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, महानिर्मितीचे मुख्य अभियंता संजय चोपडे, महावितरणचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, महापारेषणचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरत पाटील, महानिर्मितीचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी पुरुषोत्तम वारजूरकर, महानिर्मितीचे सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड, अधीक्षक अभियंता तथा सचिव प्रांजल कांबळे, शिरीष काटकर, प्रसाद निकम परिश्रम घेत आहेत.