कसं देवाभाऊ म्हणतील तसं…

1
332
बातम्या शेअर करा


मुख्यमंत्री देवाभाऊंनी या वेळेला भलताच ‘टप्प्या’त कार्यक्रम करायचं ठरवलेलं दिसतंय. आधी त्यांनी भाजपचे 132 आमदार निवडून आणले. मग अजित पवारांना पटवले, आणि मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला. शिंदे रागावले, रुसले, नाराज झाले. पण देवाभाऊंनी ताकास तूर लागू दिला नाही. सगळी खिचडी पकल्यावर मग आरामात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजीतदादा आधीच उपमुख्यमंत्रीपदाचे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. त्यामुळे एकनाथभाऊंचा स्वाभीमान गळून पडला आणि त्यांनीही उपमुख्यमंत्रीपदाच्या मुंडावळ्या बांधल्या. पण खेळ एवढ्यावर थांबणार नव्हता. मंत्रीपदाच्या शपथविधीला देवाभाऊंनी आणखी लांबण लावली. त्यांच्या काही अटी शर्ती होत्या. म्हणजे फक्त भाजपचेच नाही तर अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचे मंत्री देखील मीच ठरवणार. मी सांगेन ते इन, मी सांगेन ते आऊट. त्यामुळेही बरीच खळखळ झाली.

…….पण देवाभाऊ वस्ताद. ते कसली दाद फिर्याद ऐकतात. त्यांनी असा चेस मांडला आणि असा चेकमेट दिला कोणाला काहीच कळले नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या पायाखालची वाळूच सरकली. माणसेही सटकली. छगन भुजबळ ही झलक आहे. पण अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकर हे काही गप्प बसणारे नमुने नाहीत. भाजप सोडून महायुतीतल्या शिंदे आणि अजीत पवार गटात नाराजांची संख्या बरीच मोठी आहे. हे नाराज अजितदादा आणि एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढवणार. ती निस्तारता निवारता दोन्ही छोट्या भावांच्या नाकीनऊ येणार, आणि मोठा भाऊ त्यांची गंम्मत बघणार.

आता हेच पहा ना हिवाळी अधिवेशन संपत आले तरी अजून मंत्रीपदांचे खातेवाटप नाही. नुसतेच मंत्री. बिनखात्यांचे. म्हणजे सगळी खाती सध्या देवाभाऊंकडे आहेत. बाकी सगळे बसलेत हात चोळत. पंगत बसलीय. पत्रावळ्या वाढल्यात. पण भातच नाही. वाढण कधी होणार, पुंडलिक वरदा कधी होणार आणि हाता तोंडाची गाठ कधी पडणार? माहीत नाही. थांबा आणि वाट पहा. सध्या मीठ वाढलंय ते चाखा. त्या दरम्यान देवाभाऊंनी विधानसभेच्या अध्यक्षपदी आणि विधानपरिषदेच्या सभापतीपदी आपली माणसे बसवून टाकली. राहूल नार्वेकर आणि राम शिंदे. त्यावर एकनाथभाऊ आणि अजितदादांनी कुरकूर करु नये म्हणून देवाभाऊंनी अचानक उद्धव ठाकरेंची भेट घेऊन टाकली. एक चटका अजिदादांना, दुसरा चटका एकनाथभाऊला. आहे ना गंम्मत! तर मंत्र्यांचे खातेवाटप कधी होणार? कोण कुठल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होणार? हा गेम अजून बाकी आहे. हे काहीच नाही, खरा पिक्चर तर खातेवाटप झाल्यावर सुरु होईल. अजून तर काही विकेट पडायच्या बाकी आहेत. आस्ते कदम. देवाभाऊंनी खिचडी तर फर्मास पकवली आहे, पण हात तोंड पोळणार नाही याची काटेकोर काळजी घेऊन ते ताव मारणार असं दिसतंय. ठंडा करके खावो. म्हणजे हवं तेवढं खाताही येतं आणि पचवताही. कसं? देवाभाऊ म्हणतील तसं! इलाजच नाही!! नो चान्स!!!


बातम्या शेअर करा

1 COMMENT

  1. खूपच सुंदर लिखाण अगदी टॅग लाईन पासून ते शेवटपर्यंत खूप सुंदर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here