सरड्यांना निसर्गाने रंग बदलण्याची अद्भुत कला दिली आहे. त्याचा वापर स्वसंरक्षणासाठीच केला पाहिजे एवढी नैतिकता या सरड्यांनी अजूनही पाळली आहे. त्यांचा बाकी काही स्वार्थ नाही. जेव्हापासून ही प्रजाती पृथ्वीवर उत्पन्न झाली असेल तेव्हापासून त्यांनी आपली रंग बदलण्याची कला जपली आहे एवढेच नव्हे तर कित्येकांना त्यांनी खूप मोठी प्रेरणा दिली आहे…ज्या जमातींनी ही प्रेरणा घेतली त्यात सर्वाधिक संख्या आहे ती भारतातील राजकारण्यांची…
आपले राजकारणी रंग बदलण्यात एवढे वाकबगार झालेत की अशा नेत्यांना बघून खरे सरडे बेशुद्ध पडू लागले आहेत…. दिवसागणिक आणि क्षणाक्षणाला रंग बदलण्याची कला पाहून सरड्यांना राजकारण्यांचा हेवा वाटू लागला आहे. खऱ्या सरड्यांना नैसर्गिक बदलाचे संकेत पाळून रंग बदलावे लागतात, परंतु भारतातील राजकारण्यांना कोणतीही तत्व, संकेत न पाळता किंबहुना ती पायदळी तुडवूनच स्वर्थानुसार रंग बदलण्याची सवलत मिळाली आहे. त्यांच्यावर ना निसर्गाचे , ना लोकांचे, ना लोकशाहीचे, ना नैतिकतेचे, ना लाजलज्जेचे बंधन आहे…. त्यांनी स्वार्थ आणि निर्लज्जपणा कोळून प्याला आहे. ते कधीही निळे, हिरवे, भगवे, संमिश्र रंगाचे होऊ शकतात. लोकांना मूर्ख बनविण्यासाठी आणि
सत्तासंपत्तीचा स्वार्थ साधण्यासाठी त्यांना या कलेचा, कौशल्याचा फार मोठा उपयोग होतो. कोणताही रंग धारण केला तरी टाळ्या पिटणारे, जयजयकार करणारे, सतरंज्या उचलणारे, कामधंदा सोडून आपल्यापाठी पळणारी लाखो मेंढरं या देशात आहेत याची त्यांना पूर्ण जाणीव आहे.
विशेषतः गेल्या तीस चाळीस वर्षांत जेव्हा राजकारणातून सत्ता, संपत्ती, मोठेपणा मिळवता येतो हे लक्षात येऊ लागले तसतसे तत्वशून्य, नितिशून्य हवशे नवशे गवशे या क्षेत्रात मोठ्या संख्येने येवू लागले. त्यामुळे दिवसेंदिवस राजकारण बकाल, बेजबाबदार, अनैतिक, स्वार्थी, ढोंगी, सत्तापिपासू झाले. सध्याचा काळ हा या रंग बदलत्या राजकारणाचा कळस म्हटला पाहिजे.
एखादा नेता सकाळी शिवसेनेची जहाल भाषा बोलतो, हिंदुत्वाशी आणि भगव्याशी कधी गद्दारी करणार नाही म्हणून ठासून सांगतो आणि बघावं तर दुपारच्या जेवणाला अहिंसावादी, गांधीवादी काँग्रेसच्या शाकाहारी पंक्तीत मांडीला मांडी लावून बसलेला दिसतो. धनुष्यबाण टाकून एकदम गांधी टोपी डोक्यावर घालतो. काँग्रेसच्या पंक्तीतून उठून हात धुवून मांडवाच्या बाहेर येतो ना येतो तोच त्याला मनगटावर घड्याळ बांधावे वाटते आणि तिथे कशीबशी रात्र काढून सकाळी तळ्याकाठी कमळं वेचायला गेलेला दिसतो. कधी कधी हा क्रम उलटसुलट होतो. कधी काँग्रेसला हात दाखवून मनगटावर शिवबंधन बांधता येते. त्याचे धागे कमकुवत झाले की तिथेच घड्याळ बांधून घेता येते. कधी संघाचे
‘ बौद्धिक ‘ खुंटीला टांगून आणि कमलदल चुरडून डायरेक्ट गांधीवादी होता येते. कधीकधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात यापद्धतीची अदलाबदल करता येते. डाव्याचा उजवा आणि उजव्याचा डावा व्हायला एका क्षणाचाही वेळ लागत नाही. एखादा समाजवादी हिंदुत्ववादी होऊ शकतो. हल्ली हल्ली तर रिपब्लिकन पक्षाच्या असंख्य तुकड्यामध्येही प्रवेश होऊ लागले आहेत. कधी कोणाचा स्वाभिमान गळून पडेल, कधी कोणाचा राष्ट्रवाद लुळा पडेल आणि कधी कोणाचे हिंदुत्व खुंटीला टांगले जाईल याचा भरवसा राहिलेला नाही. त्यातल्या त्यात सर्व पक्षांचा स्वार्थी, सत्तासंपत्तीचं राजकारण, भ्रष्टाचार हा किमान समान कार्यक्रम ठरलेला आहे त्यामुळे कोणालाही कुठेही आणि कधीही सोयरिक करायला अडचण येत नाही. आयाराम आणि गयाराम संस्कृती रक्तात भिनली आहे. ‘गंगा गए गंगादास, जमना गए जमनादास ‘ इतकी ही मंडळी सरावलेली असते. या सर्वांचं कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांना एका क्षणात त्या पक्षाचे विचार, आचार, इतिहास,धेय्यधोरणं कळतात. तेच एका क्षणात त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते होतात, लगेच तेच कैक वर्षे ज्यांची हयात त्या पक्षात गेली त्यांना मार्गदर्शन करतात. उपऱ्यांना आमदारकी, खासदारकी, मंत्री अशी मानाची आणि लाभाची पदं लगेच मिळतात. बाटगा हा नेहमीच जास्त निष्ठावंत असल्याचे दाखवत असतो. वर्षानुवर्षे मेहनत घेणारा कार्यकर्ता मग तो कोणत्याही पक्षाचा असो त्याने नुसत्या सतरंज्याच उचलायच्या..गरज लागेल तेव्हा झेंडे लावायचे आणि स्वार्थी , ढोंगी, सत्तापिपासू नेत्यांच्यासाठी जयजयकार करायचा आणि मिळाला तर वडापाव खावून नाहीतर उपाशी पोटी घरी जाऊन पडायचं…नेते सत्तासंपत्तीचा उपभोग घेणार, थोडा परोपकार म्हणून आपल्याच
सग्यासोयऱ्यांना, चमच्यांना कंत्राटं देणार, निवडणुकीची तिकीटं देणार…यापेक्षा दुसरे काही करायचेच नसते…त्याची गरजच नाही…कारण जनता पण तितपतच आहे…
विशेष म्हणजे मोठ्या, बड्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवरच अन्याय होतो कायम….याचेच आश्चर्य वाटते. हेच आमदार, खासदार, मंत्री होतात आणि एखादवेळ दुसऱ्याला संधी दिली की यांच्यावर अन्याय होतो…हे एक न उलगडणारे कोडेच आहे… सगळं उपभोगून, सातंच काय चौदा पिढ्यांची सोय करून, अजीर्ण होईपर्यंत खा खा करून पुन्हा अन्याय अन्याय म्हणून हेच बोंबलतात. मासा जसा पाण्याशिवाय जगू शकत नाही तसेच हे दलबदलू सत्ता, संपत्तीशिवाय राहू शकत नाहीत. यांच्यावर एवढा मोठा अन्याय होत असेल आणि क्षणाक्षणाला यांना पक्ष बदलावा वाटत असेल तर गोरगरीब, सर्वसामान्य, निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय करावे…(अर्थात आता कार्यकर्तेही हुशार झालेत.. कोणाची सरशी आहे..कोणाकडे पैसा आहे…कोणामुळे कंत्राटं मिळतील…दादागिरी केली तर कोणता नेता पोलीस स्टेशन सांभाळेल असा विचार करूनच पक्ष किंवा नेता निवडतात..त्यांना ना पक्षाच्या आचार विचारांशी देणंघेणं असतं ना खऱ्या पक्ष कार्याशी…नेत्यांनाही असेच चमकेश कार्यकर्ते हवे असतात)
या सर्व पक्ष बदलांमध्ये मला एक प्रश्न कायम पडत आला आहे तो म्हणजे जो पक्ष सत्तेबाहेर असतो तेव्हाच आणि त्याच पक्षाच्या नेत्यांवर अन्याय कसा होतो आणि तो नेता सत्ताधारी पक्षाकडे गेलाकीच त्याला न्याय कसा मिळतो…एखादा सत्ताधारी पक्षाचा नेता किंवा अगदी कार्यकर्ता अन्याय झालाय म्हणून किंवा धेय्यधोरणं पटत नाहीत किंवा विरोधी पक्षाची धोरणं पटतात म्हणून विरोधी पक्षात का जात नाही..किंवा जिथे अजिबात सत्ता मिळण्याची शक्यता नाही अशा ठिकाणी का जात नाही…(अर्थात हा माझा प्रश्न भोळाभाबडा आणि तात्विक , नैतिक आचरण गृहीत धरून आहे. अन्यथा मला त्याचे उत्तर माहीत आहेच)
आपल्याकडे नर्मदा परिक्रमा मोठ्या श्रद्धेने केली जाते. नर्मदा परिक्रमा ही भारताच्या वैभवशाली संस्कृतीचा एक भाग आहे. पण त्याच भारतात राजकीय नेत्यांची स्वार्थी
‘ पक्ष परिक्रमा ‘ ही जोरात सुरू असते. काही नेते सगळे पक्ष फिरून पुन्हा एकदा पहिल्या पक्षात येऊन ही परिक्रमा पूर्ण करतात. काही दुसऱ्या, तिसऱ्या पक्षात जावून तिथेच बस्तान मांडतात…त्यांना मूळ घराची ओढ राहत नाही. अशी पक्ष परिक्रमा करणाऱ्या नेत्यांची, बड्या कार्यकर्त्यांची संख्या खूपच वाढते आहे. हे लोकशाहीला आणि देशाच्या विकासासाठी घातक आहे. फक्त यामुळे खऱ्या सरड्यांनाच आनंद वाटतो आहे तो म्हणजे क्षणाक्षणाला रंग बदलणारी ही नवी जमात किंवा प्रजाती मोठ्या प्रमाणात फोफावल्याने जग सरड्यांना कधीच विसरू शकणार नाही. सिमेंटच्या जंगलात खरे सरडे नाही पाहता आले तरी त्यांची प्रगत पिढी लोकं सहज पाहू शकतील.
काहीवेळा प्रामाणिक काम करूनही, निष्ठा ठेवूनही अन्याय होतो..नाही असं नाही. पण अशी मंडळी दुर्मिळ. केवळ तत्वासाठी, नैतिकतेपोटी आणि मुळात निस्वार्थ भावनेने केलेला पक्षत्याग किंवा पक्षप्रवेश समजू शकतो. पण सध्या कधी कोणाला सत्तासुंदरीची ऊर्मी येईल याचा भरवसा राहिलेला नाही.
राजकीय पक्षांनी कोणत्याही नेत्याला आपल्या पक्षात प्रवेश देताना किमान वर्षभर तरी कोणतेच पद देऊ नये. त्याला पक्षाची आर्थिक, सामाजिक, राजकीय धेय्य धोरणं, इतिहास समजून घेण्यासाठी, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ग्राउंड लेव्हलला काम करायला लावले पाहिजे. त्याच्या कामाचा आढावा घेतला पाहिजे आणि मगच आमदारकी, खासदारकी, मंत्रिपद दिले पाहिजे. या अटीवर जो येईल , काम करेल तर तो खरा… अन्यथा स्वार्थी!
नाहीतर असे गाव फिरणारे तुपाशी आणि घर सांभाळणारी मंडळी आपली कायम उपाशी….
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
९८५०८६३२६२