मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
9850863262
राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती झाली. त्यानिमित्ताने सन्माननीय मुख्यमंत्री ना. श्री. उद्धव ठाकरे यांची (नेहमीप्रमाणे) संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत दिवसरात्र ऐकणे आणि पाहणे क्रमप्राप्तच आहे. कोणत्याही न्यूज चॅनलवर जा तिथे दोन दिवस तरी हीच मुलाखत दिसणार आहे. मधल्या काळात ज्या काही मुलाखती घेतल्या गेल्या त्या धडाकेबाज, स्फोटक, जबरदस्त अशा होत्या. (असे राऊत यांनीच सांगितले आहे) यावेळी मात्र सर्वजणं (अगदी काँग्रेसवालेही) वर्षपूर्तीच्या आनंदात असल्याने उगाच वादविवाद नकोत म्हणून आपला अभिनंदनपर मुलाखतीचा घाट घातला गेला. असो. अगदी अनपेक्षितपणे का होईना प्रचंड मेहनत घेऊन, धावपळ करून संजय राऊत यांनी महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि आय काँग्रेस यांची मोट बांधली आणि महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. तीन महिन्यातच त्याच्यापाठी
कोरोनाची पीडा लागली ती आजही चालूच आहे.
युतीची सवय मोडून आघाडीत सहभागी व्हायचं आणि केवळ सहभागी व्हायचं नाही तर या सरकारचे नेतृत्व करायचं म्हणजे काही सोपं काम नव्हतं…पण उद्धव ठाकरे यांनी अत्यंत शांतपणे, संयमाने हे सरकार वर्षभर चालवले (पळवायला संधीच मिळाली नाही आणि कोरोनाचा खोडा पायात असताना त्याची शक्यतापण नाही) याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच…कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा मुरलेल्या, बेरकी राजकीय पक्षांना सांभाळणे सोपे काम नाही.(भाजपवाल्यांपेक्षा कदाचित सोपे वाटत असावे)त्यामुळे ठाकरे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल अशी अपेक्षा बाळगू. (ते कधी पाडायचे हे आपल्या हातात नाही. ते काँग्रेसच्या हातात आहे. त्याच बरोबर सरकार पतनाचा मुहूर्त राष्ट्रवादीच्या घड्याळात शपथविधीच्या दिवशीच फिक्स सुद्धा करून ठेवला असू शकतो.) असो. काय काय होईल ते कळेलच लवकर. दानवे , दरेकर आणि सोमय्या पंचांग घेऊन फिरत आहेतच. फडणवीस मात्र डोळे मिटून शांतपणे सत्तेच्या गोळ्यावर लक्ष ठेऊन आहेत..त्यांना काही घाई दिसत नाही. पाडण्यापेक्षा सरकार आपले आपण पडले तर जास्त फायदा आहे अशी त्यांची भूमिका आहे. (कारण काही गुप्त योजना आखली तरी दानवे, दरेकर, पाटील यांच्या तोंडाला कुलूप कसे लावणार ही त्यांची खरी समस्या आहे.)उद्धव ठाकरे यांची मुलाखत पाहून आणि ऐकून पाठ होते नाही तो विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारचे वाभाडे काढले. थोडक्यात सरकारची वर्षपूर्ती होत असताना काही दिवस दोन्हीकडून शाब्दिक चकमक सुरूच राहील. या सर्व गदारोळात चंद्रकांत पाटील यांनी जाणीवपूर्वक एक मुद्दा मांडला तो म्हणजे उद्या दुसऱ्या कोणाला मुख्यमंत्री करण्याची वेळ आली किंवा संधी मिळाली तर शरद पवार अजित दादांना बाजूला सारून स्वतःच्या मुलीलाच अर्थात सुप्रिया सुळे यांनाच तशी संधी देतील. या वक्तव्यामागे चंद्रकांत पाटील यांचा राजकीय हेतू लक्षात घेतला तरीही एक त्रयस्थ म्हणून मला नेहमी वाटत आले आहे की अजित दादांना एकदा तरी मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली पाहिजे. त्यांच्यासारखा अनुभवी , अभ्यासू आणि मुळात तडफ असलेल्या नेत्याला अशी संधी नक्कीच मिळाली पाहिजे. त्यांची सर्वात मोठी आणि जमेची बाजू म्हणजे प्रशासनावरील पकड…मुख्यमंत्री म्हणून सोडाच पण साधा राज्यमंत्री झाला तरी अत्यंत महत्त्वाची, गरजेची अशी ही गोष्ट आहे. याबाबतीत अजित दादांच्या तोडीचा नेता सध्या तरी महाविकास आघाडीत दिसत नाही. स्वतः उद्धव ठाकरे यांना प्रशासनाचा अजिबात अनुभव नाही अशावेळी उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांची भूमिका, त्यांचं त्या पदावर असणे गरजेचे आहेच. विरोधी पक्ष तर उद्धव ठाकरे हे नावाला मुख्यमंत्री असून अजितदादाच सर्व मंत्रिमंडळ आणि मंत्रालय आपल्या ताब्यात ठेऊन आहेत अशी टीका करतात. या टीकेत अजिबातच तथ्य नाही असेही नाही, पण तरीही शेवटी प्रत्यक्ष मुख्यमंत्री असणे, त्या पदावर विराजमान होणे महत्वाचे ठरते. गेल्या पंचवीस वर्षांत अजितदादांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली, स्वतःचे वलय निर्माण केले आहे. शरद पवारांचा पुतण्या या ओळखीतून, त्या प्रभावातून ते केव्हाच बाहेर पडले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीत तर मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थक आहेतच पण अन्य पक्षातही त्यांचे चाहते, हितचिंतक आहेत आणि त्यांना दादांना मुख्यमंत्रीपद मिळावे असे कायम वाटत आले आहे. रोखठोक स्वभाव, झटपट निर्णय घेण्याची क्षमता, वास्तवाचं भान ठेवून काम करण्याची भूमिका, वेळेचा आणि अनुभवाचा पुरेपूर वापर करून कामाचा उरक करण्यावर असलेला भर यामुळे अजित पवार हे राज्याच्या राजकारणात आणि मंत्रालयात खऱ्या अर्थाने ‘ दादा ‘ आहेत. दादा आहेत म्हणजे काम होणार, अडेलतट्टू प्रशासनाला नक्की कामाला लावणार याची खात्री लोकांना वाटते यातच त्यांचे मोठेपण आहे. अर्थात दादांना अडीच वर्षे तरी मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त करताना आघाडी सरकारमध्ये यावरून धुसफूस व्हावी असं नाही किंवा उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न नाही. प्रत्येकाची स्वतंत्र कार्यशैली असते. त्यांनी एकदमच अननुभवी असूनही सरकार चालवले आहे. त्यांची इच्छा नसताना त्यांना घोड्यावर बसवले गेले (खरं तर त्यांना एखाद्या शिवसैनिकाला बसवायचे होते असं म्हणतात)आणि ज्यांची इच्छा, अपेक्षा असणे चुकीचे नाही त्या अजितदादांना कार्यक्षमता असूनही ती संधी मिळत नाही याची खंत वाटते. पंधरा वर्षे आघाडी सरकार असूनही मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे राहिले. तिथे काहींना लॉटरी लागली. आत्ताही आघाडी सरकार आले पण मुख्यमंत्री शिवसेनेचा करण्याची प्रतिज्ञा संजय राऊत यांनी केल्यामुळे दादांना पुन्हा एकदा ‘ उप ‘ वरच समाधान मानावे लागले आहे. अर्थात महाविकास आघाडीचा अगळा वेगळा प्रयोग सादर करण्याची तयारी सुरू होती तेवढ्यात मध्येच भल्या पहाटे चमत्कारिक प्रयोग सादर केला गेला. तिथेही दादा चार दिवस ‘उप’ च राहिले. त्यानंतर पुन्हा चक्र उलट फिरवून ठाकरे सरकारमध्ये त्याच पदावर कायम राहिले आहेत. उद्या भविष्यात पुन्हा काही चमत्कार झाला आणि हे सरकार पडून भाजप राष्ट्रवादीचे सरकार आले तरी दादा पुन्हा ‘उप’ च राहणार…कारण देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मुख्यमंत्रीपद फिक्स आहे. या सरकारमध्ये किंवा पुन्हा काही नवीन घडामोडी घडल्या, समीकरणे जुळली तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या कार्यक्षम पुतण्याला मुख्यमंत्रीपद मिळेल यासाठी जरूर विचार केला पाहिजे. गेल्या काही वर्षांत प्रशासनावर वचक असलेला, धाडसी आणि ठाम निर्णय घेण्याची क्षमता असलेले मोजकेच मुख्यमंत्री झाले. त्यात कोकणातले दादा राणे आणि विदभातले देवेंद्र फडणवीस यांची नावं डोळ्यासमोर येतात. सध्याच्या काळात या दोघांबरोबरच अजितदादा या पदासाठी सक्षम, योग्य व्यक्ती वाटतात.
अनेकांना आणि मला व्यक्तिशः वाटणारी इच्छा व्यक्त केली आहे एवढेच. कारण त्यांच्या राजकारणाशी, त्यांच्या वैचारिक भूमिकेशी प्रत्येकजण सहमत असण्याचे कारण नाही. त्यांच्यावर सिंचन घोटाळा, बँक घोटाळा असे विविध प्रकारचे आरोप झाले, काहींची चौकशी चालू आहे, काही प्रकरणातून त्यांना क्लीन चीट मिळाल्याचे दिसते. दादा जर दोषी असतील तर त्यांना पाठीशी घालू नये, त्यांनी भ्रष्टाचार केला असेल तर त्यांना योग्य ती शिक्षाही झाली पाहिजे याबाबत कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही.दादांच्या कार्यक्षमतेचा विचार करून त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी एवढाच मुद्दा आहे. जर संधी मिळाली तर त्यांनी भ्रष्टाचार, गैरकारभार यापासून लांब राहून आपल्यातील नेतृत्व गुणाचा , योग्य आणि धाडसी निर्णय घेण्याच्या क्षमतेचा उपयोग महाराष्ट्राच्या कल्याणासाठी कसा होईल याकडे लक्ष द्यावे. (स्पष्ट, मनात आहे तेच बोलावे पण अगदीच धरणातील ‘ ती ‘ भाषा नको) राजकीय पेच..डावपेच, फायदा तोटा याचा तसेच मुलगी की पुतण्या याचा विचार न करता पवार साहेबांनी दादांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल यासाठी आपली ताकद वापरावी एवढीच माफक अपेक्षा…