चिपळूण -लाईफकेअर हॉस्पीटलच्या बदनामीसाठी डॉक्टरने नेत्यांचे कान भरले.. अशा आशयाची व्हाटस्अॅपवर वायरल केलेली पोस्ट माझ्या वाचनात आली. अर्थात निनावी पोस्ट केलेला तु माझा प्रिय मित्र कोण आहेत? हे मला चांगले माहित आहे. नावानिशी पोस्ट करण्याची तुझी हिम्मत झाली नाही, यावरून या पोस्टमागील बोलविता धनी कोण आहे, हे मला चांगलेच माहित आहे.
असो, आपण आपल्या पोस्टमध्ये डॉ. पुजारी यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांनी नेत्यांचे कान भरले असे म्हटले आहे. परंतु, डॉ. पुजारी कोण? ते कसे दिसतात? हे परवा तहसीलदार कार्यालयात बैठक होईपर्यंत मला माहित नव्हते. त्या दिवशी पहिल्यांदा पुजारी दाम्पत्याला मी पाहिले आणि भेट झाली. माझ्या ३६ वर्षांच्या राजकीय व सामाजिक जीवनामध्ये मी कधीही मला कोणी कोणाबद्दल सांगितलं म्हणून त्या व्यक्तीबद्दल वाईट मत बनवत नाही. खात्री झाल्याषिवाय कोणाबद्दलही मी दुराग्रह ठेवत नाही किंवा कोणाबरोबरही कायमचे मतभेद ठेवत नाही. डॉ. पुजारींची व माझी ओळखही नसताना त्यांनी कान भरण्याचा प्रश्नच येत नाही.
आपण आपल्या पोस्टमध्ये लाईफकेअर हॉस्पीटलमधील डॉक्टरांची भली मोठी यादी दिली आहे. असे असताना सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी घेतलेल्या बैठकीला यापैकी एकही डॉक्टर का येवू शकला नाही? हॉस्पीटलमध्ये व्यवस्थापनाचे काम पाहणाऱ्या डॉक्टर(?)ला का पाठविण्यात आले? एवढे डॉक्टर असतील तर मग बैठकीला पाठविलेल्या डॉक्टरला हॉस्पिटलच्या, विशेषतः कोविड सेंटरमध्ये उपचार करणाऱ्या एकाही डॉक्टरचे नाव का सांगता आलं नाही? ज्या डॉ. समीर दळवी यांचे नाव त्यांनी सांगितले ते खरंच फिजिशियन आहेत का, या प्रश्नावर ते निरूत्तर का झाले? फिजिशियन नसताना कोरोना रूग्णांवर उपचार कोण करतं? याचंही उत्तर त्यांना का देता आलं नाही? आपण दिलेल्या यादीतील डॉक्टर्स हे वेगवेगळया आजारांवरील तज्ञ डॉक्टर्स आहेत. पण, हॉस्पीटलमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार कोण करतं, याचा उल्लेख पोस्टमध्ये जाणीवपूर्वक टाळला आहात? की हाडाचे, कान-नाक-डोळयांचे, स्त्रीरोगतज्ञ, कॅन्सर तज्ञच कोरोना रूग्णांवर उपचार करतात, असे आपल्याला म्हणायचे आहे?
डॉ. समीर दळवी यांनी काही तासांपूर्वीच एका खासगी चॅनलला मुलाखत देताना सांगितले की, लाईफकेअर कोविड सेंटरला २४ आॅगस्ट रोजी शासनाने परवानगी दिली. तेव्हापासून कालपर्यंत म्हणजेच एका महिन्यात या कोविड सेंटरमध्ये १३१ रूग्ण दाखल झाले. त्यातील ९२ बरे होवून घरी गेले. १५ जणांचा मृत्यू झाला आणि २० रूग्णांवर अजून उपचार सुरू आहेत. त्यांनी सांगितलेल्या आकडयांमध्ये ४ रूग्णांची तफावत आढळते, पण आज रत्नागिरी जिल्हयाचा कोरोना मृत्यूचा दर ३ टक्क्यांपेक्षाही खाली आहे. असे असताना एकटया लाईफकेअर कोविड सेंटरचा मृत्यू दर १२-१५ टक्क्यांपेक्षा जास्त कसा? कामथे उपजिल्हा रूग्णालयात पाच महिन्यांपासून कोविड सेंटर सुरू आहे. तिथे आजपर्यंत दाखल झालेल्या १३६८ रूग्णांपैकी केवळ ४१ रूग्णांचा मृत्यू झाला, तरीही त्याची शासनाने गंभीर दखल घेतली. त्यावरून लाईफकेअरमध्ये झालेले मृत्यू पाहता हे हॉस्पीटल खरोखर रूग्णांना बरे करीत आहे की त्यांच्या मृत्यूचा सापळा आहे? याचा विचार सर्वसामान्य जनताच करेल..
माझे कोणाशी भांडण, मतभेद नाही आणि लाईफकेअर हॉस्पीटलशी तर नाहीच नाही. आपल्या भागात चांगली हॉस्पीटल्स उभी राहिली पाहिजेत, या मताचा मी आहे. हॉस्पीटलमध्ये इतर आजारांवर होणाऱ्या उपचारांबद्दल मी कधीही काहीही बोललो नाही. परंतु, कोविड सेंटरमधील हा गंभीर प्रकार समोर आल्यावर रूग्णांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ मी सुरूच ठेवायला होता का? लोकांचे हकनाक बळी जात आहेत याकडे दुर्लक्ष करायला हवे होते का? जिल्हयाचा मृत्यूदर दिवसामागे कमी होत असताना लाईफकेअर कोविड सेंटरमध्ये तो १२-१५ टक्के आहे आणि रोज हकनाक बळी जात असताना मी शांत बसायला हवे होते का? पण माझा तो स्वभाव नाही. जिथे चुकीचं घडतंय तिथे मग एखादी व्यक्ती, संस्था माझ्या जवळची असेल तरीही मी शांत बसत नाही, हे सर्वांनाच माहित आहे. मी केवळ सुधारणा व्हावी म्हणून हा मुद्दा उपस्थित केला होता, हे माझ्यावर नथीतून तीर मारणाऱ्यांनी लक्षात ठेवावं. मला लोकांचे जीव महत्वाचे आहेत. त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न होत असेल तर आपण या विषयाच्या अधिक खोलात जावू.
कुणी कान भरले म्हणून मी लाईफकेअरची बदनामी केली, असे म्हणणाऱ्यांनी आणि सर्वसामान्य जनतेने आता हे वाचल्यानंतर ठरवावं की, खरंच कोणी कान भरले म्हणून भास्कर जाधवने हा मुद्दा उपस्थित केला की लोकांचे नाहक जाणारे बळी थांबावेत म्हणून? माझं कोणाशीही भांडण, वाद, मतभेद नाहीत. पण, या सर्वांमागचा बोलाविता धनी कोण आहे, हेही मला माहित आहे. या मुद्दयाच्या आडून माझ्याबद्दल सर्वसामान्य जनतेमध्ये संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की, आपण भास्कर जाधववर आरोप करतोय…!!
आ. भास्कर जाधव