खेड -संपुर्ण तालुक्याचा प्रशासकिय कारभार ज्या ठिकाणाहून हाकला जातो किंबहूना जो शासकिय अधिकारी हा कारभार हाकतो त्याच तहसिलदार पदावर काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याने तालुका प्रशासन हादरुन गेले आहे. कोरोनाला पाबंद घालण्यासाठी ज्या कार्यालयातून उपाययोजनांबाबतची कार्यवाही केली जाते त्याच तहसिल कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तहसीलदार यांचा अहवाल पॉसिटीव्ह आल्याने तहसील कार्यालयात सध्या नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. शहराप्रमाणे ग्रामीण भागातून येणारे कोरोनाबाधीतांचे आकडेही चिंता वाढविणारे आहेत. मृतांचा आकडाही वाढत आहे. या पार्श्वभुमीवर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. मात्र याच दरम्यान खेडच्या तहसिलदार प्राजक्ता घोरपडे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोना विरोधातील लढाई लढताना तालुका प्रशासनासमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
या आधी पंचायत समिती, पोलीस स्थानक, नगरपरिषद या शासकीय कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला होता. पंचायत समितीचे सभापती, गटविकास अधिकारी, त्यांचे वाहन चालक, स्विय सहाय्यक काही पोलीस, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासह काही कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वानी कोरोनावर मत करून पुन्हा कामाला सुरवात केली आहे. मात्र आता तालुका प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या तहसिलदार कार्यालयामध्ये कोरोनाने शिरकाव झाला असल्याने कोरोनाला आळा घालायचा कुणी हा प्रश्न निर्माण झाला आहे.