जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने “अशी हि रत्नागिरी”……

0
380
बातम्या शेअर करा

पश्चिमेला पसरलेला अथांग सागर तर पूर्वेकडे आभाळाशी स्पर्धा करणारे सहयाद्रीचे कडे यामधील चिंचोळी निसर्ग संपन्नपट्टी म्हणजे आमचं कोकण…..

“सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण”….
“राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन”….

नंदनवन म्हणजे स्वर्गातील इंद्राची बाग….. आमचं कोकण त्यापेक्षा कोठे कमी आहे…कोकण म्हणजे पृथ्वी वरच नंदनवन कोकण प्रदेश म्हणजे निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली सौंदर्याची उधळण…. स्वच्छ सुंदर निर्मनुष्य सागर किनारे…तितकीच संपन्न बंदरे, मराठ्यांच्या दैदित्यमान इतिहासाचे मूक साक्षीदार असलेले किल्ले, पुरातन लेणी, गरम पाण्याची कुंडे, धबधबे, लाखो लोकांची श्रद्धा स्थान असलेली गावागावातील मंदिरे, तिथल्या जत्रा, उत्सव, शेकडो जाती-प्रजातींचे पशु- पक्षी, 12 ही महिने आपली वेगवेगळी रूप दाखवणारा इथला वैविधतेने नटलेला निसर्ग हे तर कोकणच खर वैभव… पर्यटकांना जे हवं असत ते सगळं देणारा कोकण…

पण आमच्या या श्रीमंतीची आजवर जणू आम्हालाच जाणीव नव्हती .. आमच्या वैभवाची ताकद जणू आम्हालाच माहीत नव्हती. म्हणजे आमची स्थिती त्या कस्तुरी मृगासारखी होती….आपल्या जवळ च्या ठेव्याच आपण जर योग्य मार्केटिंग करण्यात यशस्वी झालो तर कोकण येणाऱ्या काळात जागतिक स्तरावर आपली एक वेगळी ओळख बनवेल यात तिळमात्र शंका नाही इतकी संपन्नता…

शहरी जीवनातील घडयाळयाच्या काटयावर धावून दमलेला माणूस गेल्या काही वर्षात कोकणातील निसर्गात आवर्जून येतोय…शरिरावरचा- मनावरचा ताण हलका करण्यासाठी कोकणात येणा-या पर्यटकाला कोकणातला शांतपणा भावतो…प्रदुषण विरहित सागरात डुंबताना तो सारी टेंशन्स विसरून जातो, झावळयांनी शाकारलेल्या, शेणाने सारवलेल्या कोकणी घरात राहताना तो वेगळ्या दुनियेत हरवून जातो …आणि कोकणात येणारा पर्यटक खास करून येतो तो इथल्या कोकणी स्वादाच्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी… मग सकाळच्या न्याहारीतील आंबोळी आणि खोबऱ्याची चटणी असो की दुपारच्या जेवणातील ताजे फडफडीत मासे..चार दिवसाच्या कोकण वास्तव्यात तो सर्वार्थाने स्वर्ग सुखाची अनुभूती घेऊनच आपल्या शहरात परततो.

इथे येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांना आवडत ते कोकणच कोकणपण … गेल्या काही वर्षात विकासाच्या नावाखाली जे प्रकल्प इथे लादले जात आहेत आणि गेले आहेत त्यातून पुढील काही वर्षात आपण कोकणच हे कोकणपण तर गमवून बसणार नाही आहोत ना अशी भीती मनात दाटून जाते..कोकणी माणसाचा विकासाला विरोध नाही पण हा विकास कोकणच कोकणपण टिकवून असावा इतकीच माफक अपेक्षा आहे.

गेल्या 20 वर्षात कोकणातील गावागावातील तरुण मंडळींनी जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नातून अनेक गावातून पर्यटन विकसित झालंय.. अधिक व्यावसायिक पध्द्तीने पर्यटकांना सुविधा आणि सेवा देत या तरुण मंडळींनी जगभरातून आलेल्या पर्यटकांची वहावा मिळवली आहे. यामुळेच एकदा कोकणात येऊन गेलेला पर्यटक आता पुन्हा पुन्हा कोकणात येऊ लागला आहे.
गेल्या काही काळात रत्नागिरी पर्यटनाचे नवं डेस्टिनेशन ठरत आहे. एकेकाळी गोवा पर्यटनाचे मुख्य केंद्र होते. हळूहळू पर्यटक गोव्यातील गर्दीला कंटाळून तळकोकणातील-सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळांना पसंती देऊ लागला.आणि आता गेल्या काही वर्षात हाच पर्यटक रत्नागिरी कडे वळतोय….आणि रत्नागिरी हि पर्यटकांना जे हवंय ते देण्यासाठी सज्ज झालेय… नाट्यातील गणेश रानडे यांच्या “गणेश ऍग्रो” ने कृषी पर्यटनात काही वर्षांपूर्वी उतरण्याचे जे धाडस दाखवलं त्या पावलावर पाऊल टाकलं रत्नागिरी च्या आसपास आंब्याच्या बागातून अनेक कृषी पर्यटन केंद्र आता उभी राहिली आहेत….रत्नागिरी च्या किनाऱ्यावर कौस्तुभ सावंत – सुहास ठाकूरदेसाई सारखे तरुण हर्षा स्कुबा सारख्या सुविधा देत पर्यटकांना आजवर कधीही न दिसलेली रत्नागिरीच्या समुद्रातील अदभुत दुनिया दाखवत आहेत…. गणपतीपुळ्यात सरदेसाई दांपत्य 500 वर्षांपूर्वी च्या कोकणी संस्कृती ची ओळख “प्राचीन कोकण” सारख्या प्रकल्पातून करून देत आहेत.. भाई रिजबुड यांनी जगा समोर आणलेली रत्नागिरी परिसरातील शेकडो कातळशिल्प रत्नागिरीला जागतिक स्तरावर नवी ओळख देत आहे…तर मालगुंड-गणपतीपुळेच्या किनाऱ्यावर इथली स्थानिक तरुण मंडळी वॉटर स्पोर्ट मधून पाण्यातील साहसी खेळातून पर्यटकांना खुश करत आहेत…. मालगुंड च्या किनाऱ्यावर एरिक पॅरा मोटरींग च्या माध्यमातून उंच आकाशातून कोकण दाखवत आहेत….तर जिद्दी आणि रत्नदुर्ग माउंटेनिअरिंग तर कोकणात साहसी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटना व्हॅली क्रॉसिंग- निसर्ग निर्मित गुहेची सफर घडवत आहेत…मुंबई ची झगमगती दुनिया सोडून फूणगुस गावात “आनंदाचे शेत” फुलवणारे कुलकर्णी दांपत्य पर्यटकांना अस्सल कोकण अनभवू देतय…..
रत्नागिरीत येणारा पर्यटक जसा इथल्या निसर्गाने इथे ओढून आणला जातो तसा तो खास इथल्या खाद्यसंस्कृती साठी येतो…गावागावातील पर्यटन केंद्र या पर्यटकांच्या जिभेचे चोचले पुरवत आहेतच .मालवणी फिश करी तर जगभर प्रसिद्ध झालेय पण या मालवणी फिश करी बरोबर रत्नागिरीची खास चव देण्याचा प्रयत्न “मत्स्यम” मध्ये होतोय….मालवणी फिश करी बरोबर खास रत्नागिरी ची ओळख असलेली “रत्नागिरी फिश करी” ताज्या फडफडीत माश्यां बरोबर मालवणी फिश करी च्या बरोबरीने लोकांच्या पसंतीला उतरते आहे…
येणाऱ्या काळात रत्नागिरी कोकणातील पर्यटनाच्या केंद्रस्थानी असणार आहे…स्थानिक तरुणांनी पर्यटनातून येणाऱ्या संधीत आपण कुठे असू ..याचा विचार करून नियोजन केल्यास तो या विकास प्रक्रियेचा भाग बनणार आहे…

प्रत्येक नजरेत निसर्गाच एक वेगळं रूप दाखवणारी हि “देवभूमी” येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे.

  • सचिन देसाई, रत्नागिरी

बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here