बातम्या शेअर करा

कुणीही यावं नी टपली मारुन जावं अशा प्रकारची भारतीय क्रिकेट संघाची तळाच्या फलंदाजीची अवस्था होती. पण मधल्या फळीत युवराज व तळातल्या माहीने टपली मारु पाहणा-याच्या सणसणीत कानशिलात लगावायला सुरुवात केली तिथुन ख-या अर्थाने भारतीय संघाला जिंकण्याची सवय लागली.  ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, आफ्रिका, इंग्लंड यांच्यासारख्या धाकड गोलंदाजासमोर या जोडीने पलटवार करायला सुरुवात केली व इथुनच भारतीय संघाचे विजयपर्व सुरु झाले. 

महेंद्रसिंह धोनी काल आंतराष्ट्रीय क्रिकेट मधून बाहेर पडला. भारतीय संघाला जिंकण्याची सवय लावणारा एक ग्रेट क्रिकेटर म्हणुन मी त्याच्याकडे पाहतो. महेंद्रसिंग धोनीने फक्त क्रिकेटच्या मैदानात चांगल्या वाईट परिस्थितात थंड डोक्याने कसे खेळायचे हेच शिकवले नाही तर विजयाचा उन्माद करु नये हे सुद्धा शिकवले. क्रिकेटचा खेळ आणी माणसाचे आयुष्य काही वेगळे नाही. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाताना डोकं शांत ठेवुन निर्णय घ्यावा हे त्याच्याकडून हे मी धोनीकडून शिकलो.

गेल्या काही वर्षापासुन धोनीची बॅट तळपट नव्हती, बॅडपॅच हा प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात असतोच धोनी त्याला अपवाद नव्हता त्याच्या टिकाकारांना या वेळी तोंड उघडायची आयती संधी मिळाली पण त्याच टिकोजीरावांच्या पुढच्या कित्येक पिढ्या त्याने मारलेल्या विश्वजेतेपदाच्या षटकारावर पिढ्यान पिढ्या टाळ्या वाजवतील. कसोटी, वन-डे मध्ये भारतीय संघाला त्याने आपल्या कुशल नेतृत्व गुणांनी अव्वल स्थानी नेले. आयसीसीच्या तीनही स्पर्धा भारतीय संघाने त्याच्या नेतृत्वात जिंकल्या. तळात फलंदाजी करताना पन्नाशीच्या जवळची सरासरी राखत त्याने आघाडीची व मधली फळी गडगडल्यावर मै हूँ ना म्हणत तो जगभरातील गोलंदाजांची पिसे काढत होता. वनडेत खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन त्याची सरासरी ५०.७२ आहे जवळपास ९० च्या स्ट्राईकरेटने तो गोलंदाजांना धुवत होता. आंतराष्ट्रीय क्रिकेट मधून बाहेर पडताना इंन्स्टाग्रामवर धोनीने मै पल दो पल का शायर हूँ ..गाणे पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली. वयानुसार शारीरीक बदलाने मैदानी खेळाचा आंतराष्ट्रीय दर्जा राखता येत नाही. पण म्हणतात ना, वाघ म्हातारा झाला तरी तो गवत खात नाही क्रिकेट खेळला नाही तरी तो भारताच्या संरक्षणासाठी भारतीय सिमेवर उभा राहून देशसेवा करीत होता. रेल्वे फ्लॅटफॉर्मवरचा टिसी ते जगाच्या क्रिकेटरसिकांच्या गळ्यातील ताईत हा स्वप्नवत प्रवास करणारा मैदानाबाहेरही आपल्या देशाच्या सिमेचे संरक्षण करण्यासाठी निधड्या छातीने ऊभा ठाकलेला लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग धोनीचा जीवनप्रवास जगभरातील तरुणांना सतत प्रेरणा देत राहील.

आशिष बल्लाळ -9960325174


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here