गिमवी – गुहागर तालुक्यातील गिमवी गावात सालबाई देवीचा पारंपरिक दसरा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जातो. मोरे कुटुंबाच्या चौथ्या पिढीपर्यंत जपल्या गेलेल्या या धार्मिक परंपरेला गावाच्या सांस्कृतिक जीवनात विशेष महत्त्व आहे. दसऱ्याच्या रात्री देवीचे आगमन आणि कोजागिरी पौर्णिमेच्या पहाटे विसर्जन, या परंपरेमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते.
गिमवी गावातील गणपत मोरे यांच्या घरी सालबाई देवीचे दसऱ्याच्या रात्री आगमन होते. त्यानंतर पाच दिवस देवीचा उत्सव सुरू राहतो. या काळात जाखडी नृत्याची विशेष रंगत पाहायला मिळते. पारंपरिक वाद्यांच्या तालावर सादर होणारे जाखडी नृत्य हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरते. देवीच्या दर्शनासाठी आणि उत्सवात सहभागी होण्यासाठी गुहागर व चिपळूण तालुक्यांतील भाविक मोठ्या संख्येने गिमवी गावात दाखल होतात.
मोरे कुटुंबाचे अशोक मोरे यांनी सांगितले की, त्यांच्या पूर्वजांच्या चौथ्या पिढीतील मोरे कुटुंबीय त्याकाळी गिमवी गावात आले होते. तेव्हापासून देवीची सेवा आणि उत्सवाची परंपरा पिढ्यान्पिढ्या जपली जात आहे. नवसाला पावणारी देवी अशी सालबाई देवीची भाविकांमध्ये श्रद्धा असून, नवस पूर्ण झाल्यानंतर अनेक भाविक देवीच्या चरणी नतमस्तक होतात.या उत्सवातील आणखी एक महत्त्वपूर्ण आकर्षण म्हणजे घोणसरे येथील नवसाचे नाच. देवीप्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आणि नवसपूर्तीनिमित्त सादर होणाऱ्या या पारंपरिक नृत्याला भाविकांमध्ये विशेष महत्त्व आहे. दसऱ्याच्या रात्री देवीचे आगमन, पाच दिवस चालणारा भक्तिमय उत्सव, जाखडी नृत्याची रंगत आणि कोजागिरी पौर्णिमेच्या पहाटे होणारे विसर्जन, अशा परंपरांमुळे गिमवीतील सालबाई देवीचा उत्सव श्रद्धा, संस्कृती आणि लोकपरंपरेचा अनोखा संगम ठरत आहे.

दसरा ते कोजागिरी पौर्णिमा; गिमवीत सालबाई देवीच्या उत्सवाची अनोखी परंपरा!
82
















