95

मुंबई – जुहू येथील नामांकित माणिकजी कूपर शाळेत मराठी विषय विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले कैलास उदमले यांच्या शिक्षण क्षेत्रातील २५ वर्षांच्या उल्लेखनीय योगदानाचा शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात गौरव करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका पर्सिस वाडिया यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला मुंबईतील प्रसिद्ध अस्थिरोग शल्यचिकित्सक व शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. कामदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा पर्सिस वाडिया यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत श्री. कैलास उदमले यांच्या कार्याचे कौतुक केले.

शाळेच्या वरिष्ठ इंग्रजी विषयाच्या शिक्षिका सलमा नक्वी यांनी उदमले सरांचा परिचय करून देताना त्यांच्या अध्यापनासह पत्रकारितेतील योगदानाचा विशेष उल्लेख केला. मुक्त पत्रकार म्हणून विविध विषयांचा सखोल अभ्यास करण्याची त्यांची वृत्ती अध्यापनातही उपयोगी ठरली आहे. गेल्या २५ वर्षांत त्यांनी शाळेच्या विविध उपक्रमांना सहकार्य करत विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घातली. तसेच मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी मोलाचे योगदान दिले, असे त्यांनी सांगितले. प्रमुख पाहुणे डॉ. कामदार यांनी आपल्या भाषणातून जीवनातील शाळा आणि शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी श्री. कैलास उदमले यांच्या पत्नी डॉ. मनिषा उदमले, त्यांच्या कन्या सिद्धी व रिद्धी उदमले, शाळेतील शिक्षक-शिक्षिका आणि अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी उदमले सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात बॉलीवूडमधील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक शामक डावर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती, स्वातंत्र्यलढा आणि देशाच्या विकासावर आधारित आकर्षक नृत्याविष्कार सादर केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपमुख्याध्यापक निमिष वोरा, सबीहा अहमद, देलशाद दुमासिया आणि निमिषा चतुर्वेदी यांनी उपस्थितांचे आभार मानले. शिक्षण, पत्रकारिता आणि मराठी भाषा संवर्धन या क्षेत्रांतील योगदानाची दखल घेत झालेला हा सन्मान कैलास उदमले यांच्या २५ वर्षांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here