106

चिपळूण – चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेमागे सर्वसामान्यांना आर्थिक मदत करून त्यांना सक्षम बनवणे, रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे. या माध्यमातून अनेक शेतकरी आणि कुटुंबांना उभे करण्याचे काम केले आहे. यापुढेही हे कार्य अधिक गतिमान करू. तसेच वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून कोकणासह महाराष्ट्रात नवा आदर्श निर्माण करण्याची संधी आहे. वैयक्तिक वाद-विवाद बाजूला ठेवून सर्वांनी एकजुटीने काम केल्यास कोकणाच्या विकासात मोलाचे योगदान देता येईल, असे प्रतिपादन चिपळूण सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी संस्थेच्या ३३ वा वर्धापन दिन, सहकार मेळावा, प्रगतशील शेतकरी व यशस्वी व्यावसायिकांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी केले. हा कार्यक्रम बहादूरशेखनाका येथील चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहकार भवन सभागृहात झाला.

यावेळी व्यासपीठावर चिपळूण नागरी पतसंस्थेच्या संचालिका सौ. स्मिता चव्हाण, सेवानिवृत्त अप्पर आयुक्तता सहसचिव सहकार व पणन वस्त्रोद्योग मंत्रालय मुंबईचे एस.बी. पाटील, सेवानिवृत्त सहनिबंधक पतसंस्था सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणेचे मिलिंद सोबले, सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरीचे डॉ. सोपान शिंदे, आंतरराष्ट्रीय किर्तीचे ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट (बिळाशी ) संचालिका ऍड. नयना पवार यांच्यासह अन्य संचालक उपस्थित होते.

▪️चिपळूण नागरीने सहकाराची गोडी निर्माण केली- प्रशांत यादव
वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष तथा भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यावेळी म्हणाले की, चिपळूण नागरी पतसंस्थेचे वटवृक्ष झाले आहे. या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्याकडे प्रचंड कष्ट करण्याची तयारी, सातत्य, कामावर ठाम विश्वास यामुळे या पतसंस्था पतसंस्थेची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे. या प्रवासात लोकांचा विश्वास जिंकला आहे. ‘आपली माणसं आपली संस्था’ या ब्रीदवाक्याप्रमाणे या पतसंस्थेची वाटचाल सुरू आहे. ही संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. सहकार रुजवला, वाढवला. सहकाराची गोडी निर्माण केली, या शब्दांत पतसंस्थेच्या वाटचालीच्या कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे या चिपळूण नागरी पतसंस्था संचालित सहकारी संस्था प्रशिक्षण केंद्राच्या नामफलकाचे मान्यवरांचे हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच प्रगतशील शेतकरी व यशस्वी व्यावसायिकांचा संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्यासह मान्यवर तसेच वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी सुतार समाजाचे जिल्हाध्यक्ष वासुदेव मेस्त्री, समीर होडबे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, सह्याद्री शिक्षण संस्थेची कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम आदींनी मनोगते मांडली. यावेळी भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भुरण, खेर्डी ग्रामपंचायत माजी सदस्य बाळा दाते, जिल्हा परिषद सदस्य रावी मोरे, उपनगराध्यक्षा सौ. रुपाली दांडेकर, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ. आदिती गुढेकर, चिपळूण शहराध्यक्षा रुही खेडेकर, भाजपा अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष लियाकत शाह, भाजप चिपळूण शहराध्यक्ष आशिष खातू आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले. तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य अधिकारी व कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here