115

मिरजोळी – चिपळूण तालुक्यातील महत्त्वपूर्ण आणि श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरजोळी गावात कचरा वाहतूक करणारी गाडी चक्क पुढे आणि मागे अशा दोन्ही बाजूंना नंबर प्लेट नसताना फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. गुहागर–चिपळूण मार्गावरील महत्त्वाचे गाव म्हणून ओळख असलेल्या मिरजोळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत अशा प्रकारे विनानंबर प्लेट वाहनाचा वावर सुरू असल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.


गावातील कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या या गाडीला अधिकृत परवानगी कोणी दिली? वाहनाची नोंदणी आहे का? वाहनाला नंबर प्लेट का लावण्यात आलेली नाही? तसेच या वाहनाच्या वापरासंदर्भात आवश्यक कागदपत्रांची तपासणी झाली आहे का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे, कचरा वाहतुकीसारखी महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या वाहनाबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने आवश्यक ती दक्षता घेणे अपेक्षित आहे. मात्र, गाडीच्या पुढील आणि मागील बाजूस नंबर प्लेटच नसल्याचे दिसत असल्याने वाहनाच्या अधिकृततेबाबत शंका निर्माण होत आहे. मिरजोळी ग्रामपंचायतीने कचरा संकलन व वाहतुकीचे काम एखाद्या ठेकेदाराला टेंडरद्वारे दिले आहे का ? जर हे काम ठेकेदारामार्फत सुरू असेल, तर संबंधित ठेकेदाराला कोणत्या अटींवर काम देण्यात आले? तसेच वाहनाच्या कागदपत्रांची आणि नियमपालनाची जबाबदारी नेमकी कोणाची या प्रकारची चर्चा या परिसरात सुरू आहे. दुसरीकडे, ग्रामपंचायतीच्या स्वतःच्या व्यवस्थेतून हे वाहन चालवले जात असेल, तर वाहनाच्या वापरास मंजुरी कोणी दिली आणि आवश्यक नियमांचे पालन होत आहे की नाही, याची चौकशी होणे गरजेचे आहे. श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या मिरजोळीमध्ये सार्वजनिक स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनाबाबत अशी परिस्थिती का निर्माण झाली, हा चर्चेचा विषय ठरत आहे. संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने या वाहनाची नोंदणी, परवानगी, कचरा वाहतुकीच्या कामाचा ठेका आणि नंबर प्लेट नसण्यामागील कारण याबाबत अधिकृत खुलासा करणे आवश्यक आहे.
वाहनाच्या पुढील आणि मागील बाजूस नंबर प्लेट नसल्याची काही व्हिडिओ आणि छायाचित्र सोशल मीडिया प्रसिद्ध झाली आहे.
आता प्रश्न एवढाच—मिरजोळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत विनानंबर प्लेट कचरा गाडीला परवानगी नेमकी कोणाची? आणि या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी कोण स्वीकारणार? ग्रामपंचायत प्रशासनाच्या अधिकृत भूमिकेनंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here