गुहागर – विहिरीत पडून संकटात सापडलेल्या रानगव्याला वनविभागाच्या अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामस्थांनी संयुक्त बचावकार्यातून सुरक्षित जीवनदान दिले. पालपेणे येथील मधलीवाडी परिसरात घडलेल्या या घटनेत रानगव्याला कोणतीही इजा न होता विहिरीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याची प्रकृती सुस्थितीत असल्याची खात्री करून नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
पालपेणे येथील समीर सखाराम घाणेकर यांच्या विहिरीत रानगवा पडल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामस्थांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत अडकलेल्या रानगव्याची पाहणी केल्यानंतर त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बचावकार्य हाती घेण्यात आले. रानगव्याला कोणतीही दुखापत होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेत विहिरीत जाळी टाकण्यात आली. वनविभागाच्या पथकाने नियोजनबद्ध प्रयत्न करत रानगव्याला सुखरूप विहिरीबाहेर काढले. बचावकार्यानंतर रानगव्याची प्रकृती सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. वनविभागाच्या तत्परतेमुळे आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे वन्यजीवाचे प्राण वाचले. हे बचावकार्य गिरिजा देसाई, विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) प्रियांका लगड, सहायक वनसंरक्षक, रत्नागिरी (चिपळूण); एस.एस.खान, वनपरिक्षेत्र अधिकारी, चिपळूण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलतर अमित निमकर, वनपाल गुहागर; सिध्देश्वर गायकवाड— वनरक्षक, रानवी; अरविंद मांडवकर – वनरक्षक अडूर; कुमार पवार— वनरक्षक अबलोली व ग्रामस्थ व वनविभागाच्या अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामस्थांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे रानगव्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यश आले. या संयुक्त बचावकार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
















