महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची परंपरा मोठी आहेच. मात्र कोकणातील गणेशोत्सव हा सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा वैशिष्ट्यपूर्ण घटक आहे. कोकणातील गणेशोत्सव आणि चाकरमानी हे समीकरण पिढ्यापिढ्यांच आहे. कोकणी माणूस कामानिमित्त मुंबईत आला. मात्र त्याने त्याची परंपरा, सण, संस्कृती कायम जपली. कोकणी माणूस आपल्या सणांसाठी, आपल्या परंपरांसाठी दरवर्षी नित्यनियमाने न चुकता कोकणात जातो.
कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे गौरी-गणपती या सणासाठी दिवाळीपेक्षाही जोरदार तयारी केली जाते. आणि सर्व तयारीनिशी उत्सव साजरा केला जातो. कोकणात सार्वजनिक वा घरगुती गणपतींचे आगमन हा एक जल्लोषच असतो. गावांतील 40-50 कुटुंबीयांचे गणपती एकत्रित डोक्यावरून वाहून नेतात. यातून कोकणातील संघटित उत्सवाचे स्वरूप लक्षात येते. सार्वजनिक गणपतीच्या तुलनेत घरगुती गणपतीचे प्रमाण अधिक असते.
कोकणातील गणेशोत्सव हा अर्थकारणांचाही मोठा स्रोत आहे. या कालावधीत शहरांतून मोठय़ा प्रमाणात भाविक आपापल्या गावी येतो. त्यामुळे कोकणात रेल्वेसह सर्व वाहतुक व्यवस्थेची तयारी आधीपासूनच केली जाते. यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे इतर सणांप्रमाणेच अत्यंत साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गणेशोत्सव साजरा करण्याकरिता काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. या सुचनांचे पालन करुन उत्सव साजरा केला जावा अशी अपेक्षा आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सर्व संबंधित सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासनाची त्यांचे स्थानिक धोरणानुसार यथोचित पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. covid-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, तसेच मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासन यांचे मंडपा बाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी. श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता 4 फूट व घरगुती गणपतीसाठी 2 फुटाच्या मर्यादित असावी. यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू संगमरवर आदि मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्याघरी करावे. घरी विसर्जन करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. गणेश मूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास त्या मूर्तीचे विसर्जन माघीगणेशोत्सव विसर्जनाच्यावेळी किंवा 2021 च्या भाद्रपद महिन्यात म्हणजेच पुढील वर्षाच्या विसर्जनाच्यावेळी करता येणे शक्य आहे. जेणेकरून श्री गणेशाचे आगमन/ विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळता येऊ शकते. यामुळे स्वतःचे व कुटुंबीयांचे कोरोना साथीच्या रोगांपासून रक्षण होईल. उत्सवाकरिता देणगी/ वर्गणी स्वेच्छेने दिलास त्याचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिबिरे उदा. रक्तदान शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना,मलेरिया, डेंगू असे आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय त्याचप्रमाणे स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसेच ध्वनिप्रदूषण संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे. श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन केबल नेटवर्क वेबसाईट व फेसबुक इत्यादींद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण करावे तसेच थर्मल स्क्रीनिंग ची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजिकल डिस्टेंसिंग) तसेच स्वच्छतेचे नियम मास्क, सँनीटायझर इत्यादी पाळले जाईल, याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. श्री च्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्यादृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील अथवा इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रित काढण्यात येऊ नये. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आदींच्या मदतीने कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी. covid-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्याचे देखील अनुपालन करावे. अशी शासनाची अपेक्षा आहे. गृह विभागाने काढलेल्या या सुचनांमध्ये आगामी काळात काही बदल होऊ शकतो अथवा नवे नियम देखील येवू शकतात त्यानुसार गणेशोत्सवाचे नियोजन करणे योग्य असणार आहे.
प्रविण डोंगरदिवे
माहिती सहाय्यक
विभागीय माहिती कार्यालय
कोकण विभाग, नवी मुंबई
![](https://pragatitimes.in/wp-content/uploads/2020/07/IMG-20200729-WA0015.jpg)
![](https://pragatitimes.in/wp-content/uploads/2020/07/IMG_20200720_200828-1024x642.jpg)