गुहागर – गुहागर तालुक्यात पडवे येथील बोगस डॉक्टर कोरोना पॉझिटिव निघाल्याने याठिकाणी तपासणीसाठी गेलेल्या आरोग्य पथकाला तेथील महिला वर्गाने विरोध केल्याची घटना सोमवारी घडली, यामुळे उद्या बुधवारी पोलीस संरक्षणात गावातील काही जणांचे स्वॅब नमुने घेतले जाणार आहेत.
पडवे येथे ते 14 जुलै ते 24 जुलै यादरम्यान तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये 54 वयापासून 83 वयापर्यंत व्यक्तींचा सामावेश होता. एवढ्या कमी कालावधीत जास्त मृत्यू प्रमाण असल्याने तसेच गावात बोगस डॉक्टर कोरोना बाधित निघाल्याने सोमवारी कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील तपासणीसाठी गेलेल्या आरोग्य पथकाला पडवे येथील महिला वर्गाने कडाडून विरोध केला. आमच्या गावात कोणीही कोरोना बाधित नाही आम्ही सुरक्षित आहोत असे म्हणत वाद घालण्याचा प्रकार घडला यावर आरोग्य पथकाने व तेथील लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने गावातील महिलावर्गाची समजूत काढली पडवे गावात जास्त प्रमाणात मृत्यूच्या घटना घडल्याने याठिकाणी आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे असे समजावून सांगितले त्याचबरोबर या गावातील एका 65 वर्षीय व्यक्तीची आरोग्य तपासणी केली सदर व्यक्ती मंगळवारी सकाळी अचानक मयत झाल्याने पडवे गावातील आरोग्याबाबत आरोग्य यंत्रणा अधिक दक्ष झाली आहे.
कुटुंबात मयत झालेल्या व्यक्ती आहेत त्या कुटुंबातील एका व्यक्तीची स्वॅब नमुने घेऊन त्याची तपासणी केली जाणार आहे. पोलीस संरक्षणामध्ये बुधवारी पडवे गावात आरोग्य तपासणी करून 10 कुटुंबातील व्यक्तींचे स्वॅब नमुने घेतले जाणार आहेत पडवे गावात एखाद्याचे स्वॅब घेतले म्हणजे तो कोरोना बाधित आहे, असे समजून त्याच्यावर बहिष्कार पडेल असा गैरसमज आहे. यामुळे लोकांनी अशा प्रकारचा कोणताही गैरसमज न करता आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे असे आव्हान गुहागर तालुका आरोग्य विभागाने केले आहे.
गुहागर तालुक्यातील कौंढर काळसूर येथे पंधरा दिवसात आठ जणांचा मृत्यू झाला होता या पार्श्वभूमीवर त्या गावातील घेण्यात आलेल्या काही व्यक्तींचा स्वॅब नमुना निगेटिव आला आहे.