मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!

0
51
बातम्या शेअर करा

पुणे – मी पुन्हा येईन, हे वाक्य माझा पिच्छाच सोडत नाही. अलीकडच्या काळात चांगले म्हणतात, मागच्या काळात उपहासाने म्हणत होते. शेवटी एखादा शब्द आपल्याला चिपकतो, अशी तुफान फटकेबाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुणे येथे आयोजित विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातून ते बोलत होते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उदय जी मी तुमचे आभार मानतो की, तुम्ही संमेलनाला मुंबईतून पुण्यात आणले. माझ्यासारख्या नागपुरी माणसाला पुण्याची मराठी प्रमाण आहे. अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिले संमेलन असल्यामुळे पंतप्रधान नरेंद मोदी जी यांचे आभार मानतो. मधू मंगेश कर्णिक यांचा सत्कार आपण करतो आहोत, सृजनशील व्यक्तिमत्व आज नाबाद 93 आहेत ते मराठीला समृद्ध करणारे आहेत. मराठीचा विचार करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचाराशिवाय ते पूर्ण नाही. दिल्लीत साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन आम्ही केलं ही देखील आनंदाची गोष्ट आहे, मी स्वतःला भाग्यवान समजतो, असे त्यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, उदय सामंत मगाशी सांगत होते की, काही लोकांनी वाद निर्माण केला. तुम्हाला मी सांगू शकतो की साहित्य संमेलन असो, नाट्यसंमेलन असो, विश्व मराठी संमेलन असो वाद निर्माण झाला नाही तर ते मराठी संमेलन होऊ शकत नाही. वाद निर्माण करणे हा आपला स्थायीभाव आहे. कारण आपण संवेदनशील लोक आहोत. इमोशनल लोक आहोत. त्यामुळे वाद, विवाद, प्रतिवाद हा झालाच पाहिजे. यातूनच खऱ्या अर्थाने मंथन होऊ शकते. हे मी म्हणत नसून आठव्या शतकात लिहिलेल्या पुस्तकात आहे. मराठी माणसाचे विविध गुण आणि अवगुण देखील त्या पुस्तकात सांगितलेले आहेत. मराठी माणसाला कलह करायला आवडतो, हे आठव्या शतकात लिहून ठेवलेले आहे. त्यामुळे तुम्ही फार काळजी करू नका, अशा प्रकारचे संमेलन आपण करत राहायचे. कोणी नाव ठेवते, कोणी चांगले म्हणते, त्यातूनच चांगले करण्याची शक्ती आपल्याला मिळत असते, असे त्यांनी यावेळी उदय सामंत यांना म्हटले.


जगाच्या पाठीवर असा एकही देश नाही, जिथे माझा मराठी माणूस पोहोचलेला नाही. आम्ही जगभरात कुठेही जातो तर मराठी माणसे आमच्या स्वागताला तिथे असतात. दावोसला गेल्यानंतरही पाचशे आठशे किलोमीटरवरून मराठी माणसे माझ्या स्वागतासाठी आली होती. एका चिमुरड्याने लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, हे इतकं सुंदर म्हणून दाखवलं. मला हे ऐकून इतका अभिमान वाटला की आपला मराठी माणूस तिकडे गेला तरी मराठी त्याच्यापासून दुरावली नाही. माय मराठी त्याच्या मनामध्ये आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here