मराठी विश्व संमेलनाचा भव्य शुभारंभ; ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांना ‘साहित्य भूषण’ पुरस्कार प्रदान

0
86
बातम्या शेअर करा

पुणे – राज्य शासनातर्फे आयोजित मराठी विश्व संमेलनाचे पुण्यात भव्य उद्घाटन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने संमेलनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री मा. अजित पवार तसेच उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. उदय सामंत उपस्थित होते.

कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक मा. मधू मंगेश कर्णिक यांना ‘साहित्य भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठी भाषेच्या अभिजात दर्जाच्या मान्यतेबद्दल गौरवोद्गार काढताना, मा. उदय सामंत यांनी पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ४ ऑक्टोबर रोजी मराठी माणसाचे अभिजात भाषेचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले. यावेळी पुणेकरांनी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ७ ते ८ हजार मराठी युवकांनी भव्य शोभायात्रेत सहभाग घेत संमेलनाचा उत्साह द्विगुणित केला.

मालगुंड – ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून घोषित करण्याचा विचार
केशवसुत यांचे जन्मगाव मालगुंड मा. मधू कर्णिक यांनी जागतिक स्तरावर पोहोचवले आहे. त्यामुळे मालगुंडला ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय लवकरच घेतला जाईल, असे मा. उदय सामंत यांनी जाहीर केले. तसेच राज्यातील इतरही गावांना त्यांच्या वैशिष्ट्यानुसार विशेषण देण्याचे धोरण आखले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठी भाषकांच्या सन्मानासाठी ठाम भूमिका
महाराष्ट्रात विविध भाषिक समुदायांचे सहअस्तित्व आहे. मराठी माणूस इतर भाषांचा सन्मान करतो, मात्र मराठी भाषिकांना हेतुपुरस्सर त्रास दिला गेला, तर त्यावर कठोर कायदा करण्याची मागणी महाराष्ट्रातील युवकांकडून होत आहे, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. परदेशातील मराठी भाषेच्या प्रचारासाठी भरीव कार्य
मराठी भाषा संवर्धनासाठी परदेशातील संस्थांचे योगदान उल्लेखनीय आहे. काहींकडून परदेश दौऱ्यांवर टीका केली जात असली, तरी या प्रवासादरम्यान परदेशस्थ मराठी बांधव आपले स्वागत करतात आणि मराठी भाषेच्या जतनासाठी निस्वार्थ कार्य करतात, असे मा. उदय सामंत यांनी स्पष्ट केले. सध्या २५ देशांमध्ये मराठी भाषा प्रचारासाठी कार्यरत असलेल्या संस्था कार्यरत आहेत. यापूर्वी या संस्था १७ होत्या, परंतु आता त्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मराठीचा जागतिक स्तरावर प्रचार व प्रसार करण्यासाठी शासन व विविध संस्था सातत्याने कार्यरत आहेत, असेही त्यांनी सांगितले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here