चिपळूण – वनसंपदा जपण्यासाठी पर्यावरणप्रेमींची धडपड सुरू आहे. बेसुमार वृक्षतोड थांबावी, यासाठी सातत्याने ओरड होत आहे. मात्र तरीही वनपरिक्षेत्रांतर्गत मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. पर्यावरणप्रेमी शाहनवाज शाह यांनी वन विभागाकडून माहिती अधिकारात मिळविलेल्या माहितीतून दि. ६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२४ या अवघ्या २७ दिवसांच्या कालावधीत तब्बल २२५ ट्रक वाहतूक झाल्याची माहिती दिली आहे. म्हणजेच सरासरी विचार केला तर वर्षाला ४,८३० ट्रक वाहतूक होत असून सुमारे ४० लाख ३८ हजार वृक्षांची कत्तल होत असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. या आकडेवारीमुळे पर्यावरणप्रेमी सुध्दा अवाक् झाले आहेत.
पर्यावरणप्रेमी शाहनवाज शाह याबाबत माहिती देताना पुढे म्हणाले, चिपळूण वन परिक्षेत्रात चिपळूण, गुहागर, सावर्डे हा भाग येतो. ६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या २७ दिवसांच्या कालावधीत अधिकृत माहितीनुसार, चिपळूण ७७, सावर्डे ६३, गुहागर ८५ असे एकूण २२५ ट्रक भरून लाकूड वाहतूक झाली आहे. म्हणजे प्रति दिन सरासरी १३.२३ ट्रक व प्रतिवर्षी ४,८३० ट्रक म्हणजेच अधिकृत १,११,११० घनफुट लाकूड परवाना दिला गेला आहे. एक घन मीटर लाकडाचे त्याच्या प्रकारानुसार वजन ३०० ते ९०० किलो असते, म्हणजेच ८.५ ते २५ किलो सरासरी १६.७५ किलो असते. ट्रकातून १५ ते १८ टन लाकूड वाहतूक करता येते, म्हणजे ९५५ घनफूट ६ इंच ब्रिजेचे म्हणजे १ फूटव्यासाचे ३.१४ फूट गोलाईचे ३० फूट उंचीचे झाड हे ०.८१६ घनफूट म्हणजे १३ किलो भरते. अशी एका ट्रकामध्ये या मापाची १,३८४ झाडे आपण कमी जास्त गोलाईची ८०० झाडे पकडू याचा अर्थ चिपळूण वनक्षेत्रात प्रति दिन ११,०६४ झाडे याचा अर्थ प्रतिवर्षी ४० लाख ३८ हजार आणि जर त्याच्या दुप्पट गोलाईची झाडे भरली तर २० लाख १९ हजार व तिप्पट गोलाईची असली तर १३ लाख ४६ हजार वृक्षाची कत्तल होते. एक तर लावलेल्या झाडापैकी सर्वसाधारण मेहनत घेतली तर ६० टक्के झाडे जगतात. झाड वाढायला सरासरी ७ ते २० वर्षे जातात. जंगलात तर सध्या विशेष झाडे लावायला फार कमी लोक जातात. जी काही नैसर्गिक उगवतात, त्यांना वणवा जाळून टाकतो. जंगलतोडीच्या अधिकृत आकडेवारी लक्षात घेतली तर हा प्रकार महाभयानक आहे व ही अधिकृत आकडेवारी आहे. या अधिकृत आकडेवारीच्या दीडपट तरी विनापरवाना वाहतूक होते. तसेच ओव्हरलोड ट्रक भरले जातात. झाडे जीवन देतात, ऑक्सिजन देतात, यांच्याबाबत हे कुणी जराही गंभीर नाही.
कोकणात वृक्षतोड बंदीची गरज
झाडे जगवणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वेक्षण करून कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून पैसे मिळाले पाहिजेत, स्थानिक लाकूडतोड कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन झाले पाहिजे. त्यांना उद्योग किंवा कामधंदा मिळाला पाहिजे, कोकणात औद्योगिक वृक्षतोड बंदी झालीच पाहिजे. जंगलातून मल्टी कल्चर वृक्ष लागवड संगोपन संवर्धनासाठी कायदा व निधी उपलब्ध झाला पाहिजे, असेही शाहनवाज शाह यांनी स्पष्ट केले.