कोकणातील भाजप 30 वरुन 12 टक्केवर..!

0
270
बातम्या शेअर करा

  • राज्यातील विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहिर होण्याची शक्यता आहे. पितृपक्ष संपल्यानंतर विधानसभेच्या जागा वाटपांचे घट बसतील अशी अटकळ होती मात्र, अजूनही परिपूर्ण जागा वाटप
    झालेले नाही. जागा वाटपावरुन मित्रपक्षांकडून घेण्यात येणाऱ्या हरकती, एकमेकांच्या जागांवर दावा करणे, दबाव टाकून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेणे असे प्रकार सध्या राज्याच्या राजकारणात सुरु आहेत. महायुतीही यामध्ये मागे नाही. याचेच प्रत्यंतर आज येत आहे. यामागे कोकणातील भारतीय जनता पार्टीच्या जागांवर दावा करुन तेथे आपले वर्चस्व अधोरेखित करण्याचा राजकीय डाव असे म्हणता येईल.

एकेकाळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते स्व. आप्पा गोगटे, स्व.
शिवाजीराव गोताड व स्व. तात्यासाहेब नातू यांच्या कारकिर्दीत कोकणात भाजपला चांगले स्थान होते. आणिबाणीच्या काळात निवडून आलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मतदारसंघातून आप्पा गोगटे आपले चांगले वर्चस्व टिकवून होते. त्यांनी सलग चारवेळा येथून नेतृत्व केले. यानंतर अजित गोगटे व प्रमोद जठार यांनी येथून नेतृत्व केले. रत्नागिरीतून शिवाजीराव गोताड यांच्या नंतर सुरेंद्र तथा बाळ माने यांच्या माध्यमातून जिल्ह्यात भाजपाला संजीवनी मिळाली. गुहागरची जागा ही जनसंघ व त्यानंतर भाजपच्या माध्यमातून डाँ. तात्यांनी चारवेळा लढविली व जिंकली. तात्यांच्या निधनानंतर त्यांचे सुपूत्र डाँ. विनय नातू सलग चारवेळा गुहागरचे नेतृत्व करुन त्यांनी भाजपचा हा बालेकिल्ला अबाधीत ठेवला. त्याचा दबदबा कायम
होता. मात्र, बदलती राजकीय स्थित्यंतरे, जेथे आपल्या पक्षाचा हक्काचा आमदार निवडून येत असताना त्या मतदारसंघाची अदलाबदल करणे, मित्रपक्षांच्या हट्टामुळे जागा सोडण्यास भाग पाडणे, पाडापाडीचे धोरण अवलंबिणे अशा राजकीय साठमारीत गुहागर भाजप बालेकिल्ला त्यांच्याच वरिष्ठ नेत्यांकडून ढासळविण्याचे प्रयत्न सुरु झाले ते आजतागायत.

1990 पासून भाजप-शिवसेना जागा वाटप सुरु आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 11 पैकी 3 विधानसभा भाजपला तर 8 विधानसभा शिवसेनेला असा फाँर्म्युला होता. 1988/1989 पासून राम जन्मभूमी आंदोलन, शिलापूजन, कारसेवा, गावागावात भगवे ध्वज व भगवा सप्ताह अशा भगव्यामय वातावरणात सर्वच्या सर्व 11 जागा निवडून यायच्या, असे वर्षानुवर्षे सुरु राहिले. यानंतर नेत्यांची वर्चस्वाची लढाई सुरु झाली. 1999 साली मित्रपक्षाने बंडखोरी करुन गुहागर विधानसभा पाडण्याचा प्रयत्न झाला. 2004 साली रत्नागिरीमधील मित्रपक्षाच्या विश्वासघाताने रत्नागिरीमधील भाजपची जागा ठरवून पाडण्याचे काम केले गेले. 2009 साली जनसंघापासून निवडून येणारी भाजपची गुहागर विधानसभेची जागा हट्टाने मागून घेऊन मित्रहट्ट पुरविण्याचे काम करण्यात आले. आजही हा कित्ता गिरविला जात आहे. एकेकाळी स्व. आप्पा गोगटे, स्व. शिवाजीराव गोताड व स्व. तात्या नातू यांच्या दमदार कारकीर्दीत भाजप 30 टक्के होता तो मित्रपक्षांचा हट्ट, जागा वाटप, पाडापाडीचे धोरण यामुळे तो साडेबारा टक्केवर आला.

2014 ते 2019 महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपद व सरकार असतानाही 2019 च्या निवडणुकीमध्ये पूर्वी युतीच्या वाटपामध्ये 11 मध्ये 3 म्हणजे 30 टक्के,2019 चे वाटप करत असताना 8 मध्ये 1 म्हणजे साडेबारा टक्के जनसंघापासून ज्या अखंड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वांनी काम केले तेव्हापासून भाजपातील कोणताही कार्यकर्ता अन्य पक्षात गेल्याचे उदाहरण नाही. पण समोरच्या पक्षामध्ये इतकी तडजोड व पडझड असतानादेखील युतीच्या चाणक्यांनी कोकणातला भाजपा युतीच्या वाटपात 30 टक्क्यांवरुन 12 टक्क्यावर आणला. ‘वाटा कोणाला, घाटा कोणाला’ अशी स्थिती प्रत्येक कार्यकर्त्याची झाली आहे. यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून कार्यकर्त्यांना बौध्दीक
मार्गदर्शन होणे आवश्यक आहे.

या सर्व कारणांचा परिपाक म्हणजे आज विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने जागा वाटपात कोकणात गुहागरचे भाजपचे स्थान पक्के ठरले आहे. मात्र,सध्याची उठलेली राजकीय वावटळ पाहता गुहागर मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपात मित्रपक्ष सेनेला जातोय की काय अशी स्थिती आहे. भाजपने राजापूर व
गुहागर यांवर दावा केला होता. राजापूर भाजपला मिळणार नसले तरी गुहागर नक्कीच मिळेल अशी अटकळ बांधण्यात आली आहे. भाजपच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार, गुहागरची उमेदवारी डाँ. नातू यांनाच मिळणार अशी धारणा आजही आहे. गेले वर्षभर माजी आ. डाँ. विनय नातू यांनी गुहागर मतदारसंघ पिंजून काढला आहे. प्रत्येक गटात आपला कार्यक्रम, उपक्रमांच्या माध्यमातून संपर्क वाढवला आहे.

सध्याची राजकीय स्थिती पाहिली तर डाँ. नातू यांना मिळणारा मतदारांचा प्रतिसाद व मतदारांनाही बदल अपेक्षित आहे. यांविषयीचे वातावरण खूपच दिलासादायक आहे. डाँ. नातू यांची मागील कोकण पदवीधरची उमेदवारी हातून निसटली मात्र, आता गुहागरची विधानसभा कोणत्याही क्षणी निसटू नये म्हणून कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. अशावेळी मित्रपक्षाकडून गुहागरवर दावा केला
जात आहे, हे कितपत योग्य आहे, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. जिल्ह्यातील एकमेव गुहागरची भाजपची जागा हिसकावणे म्हणजे एकेकाळी 30 टक्केमध्ये असणाऱ्या भाजपला 12 टक्क्यांवर आणून त्यांना कोकणातूनच नेस्तनाबूत करण्याचा हा राजकीय डाव आहे, असेच म्हणता येईल.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here