चिपळूण – बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व खेड येथील दोन तरुणांना मुंबई क्राईम ब्रँचने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हाभरात एकच खळबळ उडाली असून या कारवाईला स्थानिक पोलिसांनीही दुजोरा दिला आहे.
गुहागर बोगस नोटा प्रकरण ; तालुक्यातील या नामवंत ग्रामपंचायत मधील सरपंचावर गुन्हा दाखल
गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील काही बाजारपेठांमध्ये बनावट नोटा उपलब्ध होत असल्याची चर्चा आहे. दोनशे व पाचशे रुपयांच्या या नोटा असून त्यातील काही नोटांचे रंग फिकट पडल्याचे प्रकारही काही नागरिकांना दिसून आले आहेत. अशातच चिपळूण व खेड येथील तरुणाला मुंबई क्राईम ब्रँचने बनावट नोटा प्रकरणी ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई क्राईम ब्रँच अधिकाऱ्यांनी चिपळूण व खेड पोलिस स्थानकात संपर्क साधून संबंधित तरुणांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्या दोघांनाही मुंबई येथे नेण्यात आले आहे. मात्र याविषयी मुंबईतील क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ न शकल्याने संबंधित संशयित तरुणांची नावे व ते कोणत्या ठिकाणी राहतात हे समजू शकले नाही.
या आधी सुद्धा गुहागर तालुक्यात आणि लांजा तालुक्यात बनावट नोटा प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास स्थानिक पोलीस करत आहेत. कोकणातील ग्रामीण भागात अशा प्रकारे बनावट नोटांचे जाळ पसरले की काय अशी चर्चा सध्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात सुरू आहे.