चिपळूण ; तो खुन सख्ख्या भावानेच केला. कोळकेवाडीतील हत्या प्रकरणी दोघांना अटक

0
424
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी तांबड वाडीमधील रवींद्र विनायक सुर्वे याच्या डोक्यामध्ये लोखंडी पाईप मारून त्याची त्याचा सख्खा भाऊ संजय सुर्वे व त्याचा सहकारी वसंत हिलम यांनी हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून त्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता संजयला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, तर वसंतला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

रवींद्र सुर्वे हा गुरुवारी रात्री आपल्या घरी होता. घरी जंगली प्राण्याचे मटण असल्याने त्याने रात्री शेजाऱ्यांकडून दोन भाकऱ्या मागून आणल्या होत्या. त्याच्यासोबत आरोपी भाऊ संजय सुर्वे व त्याचा मित्र वसंत हिलम होता. गप्पागोष्टी करताना ते मद्यपान करीत बसले होते. यावेळी रवींद्रकडे वसंत हिलमचा मोबाईल आढळला. हा आपला मोबाईल असल्याचे त्याने सांगितले व यावरून वाद झाला. तेथे असणारा. लोखंडी पाईप उचलून रवींद्रने हल्ला केला. त्याला संजयने अडविण्याचा प्रयत्न केला, परंतु पाईप हिलमला चुकता लागला. रवींद्र ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने संजयने तोच पाईप उचलून रवींद्रच्या डोक्यात मागून मारला. यावेळी रवींद्रच्या कमरेवर धारदार हत्याराने वार करुन जखमी करण्यात आले होते. यातच तो गतप्राण झाला. या प्रकरणी पोलीस पाटील बजाजी शिंदे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात खबर दिल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, ए. एस. आय. दिलीप पवार, हवालदार गणेश नाले, पोपट गव्हाणे, लालजी यादव, दीपक ओतारी, सुजित जाधव, राहुल सोलनकर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिसर पिंजून काढला. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपासाच्या दृष्टीने हालचाली वाढवल्याने आरोपीला काही तासात ताब्यात घेण्यात आले. त्यांना रात्रीच अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले असता हिलमची प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संजयला सोमवारपर्यंत चार दिवस पोलीस कोठडी सुनावली, तर वसंत हिलमला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुजित गडदे करीत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here