चिपळूण ; स्वत:ची किडनी देऊन पत्नीने वाचविले पतीचे प्राण

0
401
बातम्या शेअर करा

चिपळूण- ( विषेश प्रतिनिधी ) -दोघेही पोलिस दलात कामाला, सुखाचा संसार सुरू असतानाच पतीला एका आजाराने ग्रासले आणि त्या आजारात दोन्ही किडन्या निकामी झाल्या. पतीच्या उपचारासाठी पत्नीने वणवण सुरू केली; मात्र प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नोंदणीप्रमाणे प्रत्यारोपणासाठी थांबल्यास ते जीवावर बेतणारे होते. त्याचवेळी पोलिस दलात आपले कर्तव्य बजावणाऱ्या महिला कॉन्स्टेबलने आपली एक किडनी देऊन पतीला जीवदान मिळवून दिलेच शिवाय ‘गृह कर्तव्य’ ही पार पाडले.

चिपळूण तालुक्यातील सावर्डे पोलिस स्थानकातील महिला कॉन्स्टेबल आदिती अभिजीत गावणंग यांच्या या धाडसाचे सान्यांनीच कौतुक केले.पूर्णगड (ता. रत्नागिरी) येथील असलेल्या आदिती या पोलिस दलात सेवा बजावत असतानाच २०१० मध्ये त्यांचे आगवे येथील अभिजीत गावणंग यांच्याशी विवाह झाला. अभिजीत गावणंग हेही पोलीस दलात सक्षम कर्मचारी म्हणून ओळखले जातात. पोलिस दलातील कर्तव्य पार पाडतानाच वैवाहिक जीवन सुखी समाधानाने जगत होते. त्यांना १२ वर्षांची स्वरा ही मुलगी आहे.मात्र, २०१८ मध्ये अभिजीत यांना एका आजाराने ग्रासले. तपासणीअंती त्यांची एक किडनी व त्यानंतर काही महिन्यांनी दुसरी किडनीही निकामी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरूच केले.
बेळगाव, मुंबई येथील नामांकित रुग्णालयांमध्ये उपचार घेतले. परंतु, किडनी प्रत्यारोपणाशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता. अखेर किडनी मिळवण्यासाठी नोंदणी केली. परंतु, नोंदणीप्रमाणे किडनी मिळण्यासाठी उशीर होणार होता. अशा परिस्थितीत आदिती यांनी स्वतःची किडनी देण्याचा निर्णय घेतला.कोल्हापूर येथील एका रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण केली. त्यातही वर्षभराचा कालावधी गेला. काही महिन्यांपूर्वी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आणि जणू पतीला जीवदानच मिळाले. त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले. शिवाय पोलिस दलही सुखावले आहे. मंगळवारी आदिती गावणंग या पुन्हा एकदा पोलिस दलात नव्या दमाने कार्यरत झाल्या. यानिमित्त सावर्डे स्थानकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यानंतर आठ महिन्यांच्या रजेनंतर २९ ऑगस्ट रोजी आदिती गावणंग आपल्या कर्तव्यावर हजर झाल्या. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यासाठी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. त्यांच्या या शौर्याबद्दल सायांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुकही केले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here