चिपळूण – चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथील रवींद्र विनायक सुर्वे याच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉड मारून अज्ञात इसमाने घरामध्ये त्यांची हत्या केली. ही घटना बुधवारी रात्री घडली. चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने घटनास्थळी भेट देऊन पाहाणी केली.
रवींद्र सुर्वे हा आपली आई आणि भाऊ यांच्यासह राहात होता. त्याला मद्यपानचे व्यसन असल्याने तो सतत घरी भांडण करीत असल्याने त्याला कंटाळले होते. त्याच्यावर शिरगाव पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. काल गुरुवारी सकाळी त्याच्या घरी रवी सुर्वे हा उपडा पडला होता. त्याच्या मृतदेहालगत मोबाईल व दारूची बाटली पडलेली दिसून आली.आई व भाऊ घरी नसल्याने रात्री त्याने घरामध्ये मटण आहे असे सांगून शेजाऱ्यांच्याकडून दोन भाकऱ्या मागून आणल्या होत्या. त्यामुळे त्याची हत्या रात्रीच झाली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच अलोरे-शिरगावचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचमाना केला. सायंकाळी रत्नागिरीहून श्वान पथक व ठसे तज्ज्ञ दाखल झाले होते. त्यांनी परिसराची तपासणी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने घटनास्थळी रात्री पर्यंत ठाण मांडून होते.