गुहागर – गेल्या काही दिवसापासून कोकणात समुद्रकिनाऱ्यावर चरसचे साठे आढळून आले होते त्यामुळे पोलिसांनी शोध मोहीम तीव्र केली होती.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील बोऱ्या समुद्रकिनारी कस्टम विभागाला 2 बेवारस गोणी सापडल्या. त्या उघडल्या असता त्यामध्ये चरस या अंमली पदार्थाची 18 पाकीटे होती. त्यांचे वजन 20 किलो 700 ग्रॅम इतके होते.सदर पाकीटे कस्टम विभागाने ताब्यात घेतली असून तालुक्यातील अन्य समुद्रकिनाऱ्यांवर कस्टमचे अधिकारी व कर्मचारी गस्त घालत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कद्रे, लाडघर, केळशी, कोळथळे, मुरुड, बुरोंडी, दाभोळ समुद्रकिनाऱ्यावर 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत चरस या अंमली पदार्थाची पाकीटे सापडल्याने कस्टम, पोलीस सावध झाले होते. त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य समुद्रकिनाऱ्यांवर गस्त घालण्यास सुरवात केली. यामध्ये 19 ऑगस्ट रोजी बोऱ्या येथील समुद्रकिनाऱ्यांवर दोन गोणी आढळून आल्या.