चिपळूण – चिपळूण शहरातील भर बाजारपेठेत गुटख्याच्या साठ्यांवर अन्न भेसळ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. शहरातील दोन ठिकाणी मारलेल्या या छाप्यात लाखोंचा गुटखा जप्त करण्यात आला असून अधिकाऱ्यांची कारवाई उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
चिपळुणात राजरोसपणे गुटखा विक्री सुरू आहे. राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातली असताना अनेक ठिकाणी गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे पुढे आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यात देखील चिपळूण मधून गुटख्याचा पुरवठा केला जातो, अशी माहिती पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर अन्न भेसळ प्रशासनाचे अधिकारी चिपळुणात दाखल झाले. विशेषकरून मुंबई आणि रत्नागिरी येथील अधिकाऱ्यांनी धडकपणे ही कारवाई केली. चिपळूण शहरातील खेराडे कॉम्प्लेक्सजवळील नुरानी कॉम्प्लेक्समधील एका गाळ्यामध्ये सचिन खेराडे तर रंगोबा साबळे मार्गावरील एका फ्लॅटमध्ये गुटखा आढळून आला. दोन पथकांमार्फत ही कारवाई करण्यात आली. मुंबई व रत्नागिरी येथील अधिकाऱ्यांच्या दोन पथकांनी ही कारवाई सुरू केली असून सुमारे तीन ते आठ लाखांचा गुटखा या कारवाई जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलिसांनी देखील दखल घेतली असून घटनास्थळी पोलिसांनी देखील भेट दिली.
या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत साठा करून ठेवलेला गुटखा जप्त करून कारवाई सुरू होती. या नंतर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. विमल, आरएमडी, केसर अशा अनेक प्रकारचा गुटखा या कारवाईत जप्त करण्यात आला असून एक कार देखील जप्त करण्यात आली आहे. पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मात्र असं असलं तरी चिपळूण पोलीस ठाण्यापासून काहीच अंतरावर असलेल्या एका इमारतीत एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध साठा सापडून आल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणात काही राजकीय नेते आणि व्यापारी गुंतल्याची माहिती समोर येत आहे.