गुहागर – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारणी केलेल्या रत्नागिरी जिल्हा सह संपूर्ण कोकणातील अक्षय ठेवा असलेल्या गडकिल्ल्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.
एकीकडे मुंबईच्या अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्यासाठी शासन 3600 कोटी रुपये खर्च करीत असतानाच महाराजांनी बांधलेल्या व संरक्षण केलेल्या गडकिल्ल्यांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्यामुळे गडप्रेमीतून नाराजी व्यक्त होत आहे.
कोकणातील काही किल्ल्यांची डागडुजी शासनाने सुरू केली आहे. ही त्यात समाधानाची बाब असली तरी गेली काही वर्षे गोपाळगड या किल्ल्याकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष झाले असून याबाबत तीव्र नाराजी पसरली आहे.
रत्नागिरी येथील पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये बारा गड किल्ले व राजवाडे आहेत. मंडणगड येथील बाणकोट किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी येथील यशवंत गड व भरत गड किल्ल्याच्या दुरुस्तीची ही प्रक्रिया झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रसाळगडाचेही दुरुस्तीचे काम सुरू झाले होते. रत्नागिरी जिल्ह्यासह रायगड व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात छोटे-मोठे अनेक गडकिल्ले आहेत परंतु मोजकेच किल्ले सोडले तर बाकी पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात अद्यापही आलेले नाही. रायगड येथील पाण्यात असलेल्या उदेरी किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी साम्राज्याच्या प्रमुख घटक व इतिहासाचा साक्षीदार असलेल्या सुवर्णदुर्ग किल्ल्यावर इतिहास प्रेमी व पर्यटक मोठ्या संख्येने भेटीसाठी येतात. पालगड येथील शिवाजी महाराजांचा विशेष किल्ला आहे व त्याचीही दुर्दशा झाली आहे. किल्ल्यात जायलाही धड रस्ता नाही त्यामुळे पर्यटक व इतिहासाच्या अभ्यास यांना अनेक अडचणी येतात यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.