गुहागर – गेले कित्येक दिवस सर्वांच्या नजरा असलेल्या गुहागर पंचायत समितीचे आरक्षण अखेर आज जाहीर झाले. या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांच्या निवडणूक लढविण्याचा स्वप्नांना सुरुंग लागला आहे. राजकीय भवितव्य पणाला लागले त्यामुळे गुहागर तालुक्यात कही खुशी कही गम अशी स्थिती दिसते.
गेले अनेक दिवस पंचायत समिती आरक्षण सोडत कधी होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते.
यावेळी प्रभाग रचना बदलल्याने नेमके कोणते आरक्षण पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर गुरुवारी गुहागर पंचायत समिती सभागृहात हे आरक्षण सोडत पार पडली. यामध्ये ५५ अंजनवेल गण (सर्वसाधारण), ५६ असगोली गण (नागरिकांचा मागास प्रवर्ग), ५७ तळवली गण (सर्वसाधारण), ५८ शृंगारतळी गण (सर्वसाधारण स्त्री), ५९ मळण गण (सर्वसाधारण स्त्री), ६० कोंडकारुळ गण (सर्वसाधारण स्त्री), ६१ वेळणेश्वर गण (सर्वसाधारण स्त्री), ६२ शिर गण (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), ६३ पडवे गण(सर्वसाधारण), ६४ पाचरी सडा गण (सर्वसाधारण) असे आरक्षण पडले आहे. या आरक्षणामुळे काही इच्छुकांच्या निवडणूक लढवण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत, तर काहीना या आरक्षणाने नवे बळ दिले आहे.