चिपळूण – (विशेष प्रतिनिधी ) चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीतील एका बंद कारखान्याच्या शेड मध्ये शालेय पोषण आहाराचा सडलेला साठा आढळून आला आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. खडपोली ग्रामपंचायत व चिपळूण पंचायत समिती सभापती धनश्री शिंदे यांनी या गोडाऊन वर धाड टाकून हा प्रकार उघड केला आहे. याच एमआयडीसी मधून विशेष संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला पोषण आहाराचे धान्य वितरीत केले जात असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.
खडपोली येथील एमआयडीसी मधील एका गोडावून मध्ये 22 टन धान्य आहे यातील सुमारे ४० टक्के धान्य हे सडलेले व दुर्गंधी सुटलेले ग्रामस्थांनी पाहिले. या बाबत ग्रामस्थांनी माहिती घेतली असता हा साठा बीड येथील माहेश्वरी बचतगट यांनी केलेला आहे. ज्यावेळी ग्रामस्थांनी या ठिकाणी छापा मारला त्यावेळी हा सडलेला साठा मोठ्या फॅनवर सुकवण्याचे काम सुरू होते. पण येथील ग्रामस्थ मुराद अडरेकर व इतर यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी पंचायत समिती सभापती धनश्री शिंदे, सरपंच रोशनी पवार तलाठी नर्गिस ग्रामसेवक अधिकारी हंगे रेश्मा पवार माजी सरपंच मुस्कान अडरेकर संतोष कदम प्रवीण पवार सुरेंद्र कदम धीरज खेडेकर तसेच संदीप चिपळूणकर यांना कळविले सर्वांनी या गोडावूनची पाहणी केली. यावेळी डाळी काळ्या पडलेल्या आहेत, तसेच तांदुळ खराब झालेला आहे. मसाले हे बोगस व मिलावटी आहेत. या गोडावूनच्या चारही बाजूने घाणीचे साम्राज्य आहे. व गटारांची दुर्गंधी पसरलेली आहे. माशांमुळे या गोडावूनला घाणीचे स्वरुप आलेले आहे. आणि हे सडलेले धान्य त्याचे पॅकींग सुरु होते.
या येथील जे कर्मचारी पॅकींग प्रकीया करत होते त्यांनी मात्र हे धान्य आम्ही पैकींग करुन जनावरांसाठी खाद्य करणार आहोत असा दावा या बचत गटाच्या प्रमुखाने केला.
मात्र हेच धान्य शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना याआधी दिले गेले असुन अगोदरच त्या निकृष्ट आहाराबाबत येथील ग्रामस्थांनी तक्रारी केलेल्या आहेत असे सांगितले, त्यामुळे या प्रकारची संपूर्ण माहिती घेऊन प्रशासनाने मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या बचत गटावर कारवाई अशी मागणी जोर धरत आहे.
